दुहेरी हत्याकांडातील अनेक प्रश्न अनुत्तरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:27 IST2020-12-12T04:27:25+5:302020-12-12T04:27:25+5:30
पोलिसांची ‘ढिलाई’ही चर्चेला लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी शेख मोईन खान ...

दुहेरी हत्याकांडातील अनेक प्रश्न अनुत्तरीत
पोलिसांची ‘ढिलाई’ही चर्चेला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी शेख मोईन खान गुलाब सरवर खान याने आत्महत्या केल्यामुळे शहर पोलिसांच्या स्मार्टनेसवर प्रश्नचिन्ह लागले आहे. सोबतच काळीज पिळवटून टाकणाऱ्या या हत्याकांडाशी जुळलेले अनेक प्रश्नही अनुत्तरीत राहिले आहेत.
आरोपीने मोईनने गुरुवारी भरदुपारी हे अमानुष हत्याकांड घडवून आणले. त्याची माहिती दुपारी २ ते २. ३० च्या सुमारास शहर पोलीस दलाला मिळाली. संशयित आरोपी मोईन असावा, असाही अंदाज लगेच पुढे आला. विशेष म्हणजे, मोईन हत्याकांड घडवून आणल्यानंतर तब्बल ८ ते ९ तास शहरातच इकडे तिकडे फिरत होता. तो बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत होता. त्यासाठी तो त्याच्या मित्रांना वारंवार फोन करत होता. मात्र, शहराच्या स्मार्ट पोलिसांना त्याचा छडा लावता आला नाही.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील मोठ्यात मोठ्या गुन्हेगारांना धडकी भरेल, अशी कार्यपद्धत दाखवून दिली आहे. कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालू देऊ नका आणि गुन्हेगार कोणताही असो, त्याची गय करू नका, असे स्पष्ट निर्देश शहर पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यासाठी त्यांनी आवश्यक त्या साधन सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. असे असताना काही अधिकारी कर्मचारी पोलीस आयुक्तांच्या मूळ हेतूलाच तडा देत आहेत.
फ्री हॅण्ड, सर्व साधन सुविधा आणि मोठा पोलीस ताफा असताना तसेच आरोपीचे मोबाईल लोकेशन मिळत असतानाही दोन जणांचे जीव घेणाऱ्या मोईनला पोलीस पकडू शकले नाहीत. दुसरे म्हणजे, मोईनने एवढे मोठे हत्याकांड घडवून आणल्यानंतर कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, ते देखिल स्पष्ट होऊ शकले नाही. त्याच्या आत्महत्येमुळे या दुहेरी हत्याकांडाच्या आरोपीच्या तपासात पोलिसांनी दाखविलेली ढिलाई शहरभर चर्चेला आली आहे.
---
आजी-नातवाची अंतिम यात्रा
नाहकच क्रूरपणे मारले गेलेल्या लक्ष्मीबाई धुर्वे आणि त्यांचा नातू यश या दोघांवर शुक्रवारी अत्यंत शोकपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. चिमुकला यश धुर्वे कुटुंबातील चैतन्य होता. लक्ष्मीबाईचा तर तो जीव की प्राण होता. त्या दोघांची अंत्ययात्रा हजारीपहाड भागातील अनेकांच्या डोळ्याला ओले करणारी होती. अनेक महिला तर हुंदके देत होत्या.
---
आरोपीच्या कुटुंबीयांनाही धक्का
तिकडे आरोपी मोईनच्या कुटुंबीयांनाही या घटनेमुळे जबर मानसिक धक्का बसला आहे. घरून सकाळी १०. ३० च्या सुमारास दुकानात जातो असे म्हणून घराबाहेर पडलेला मोईन असे भयंकर कृत्य करेल, याची त्याच्या कुटुंबीयांनी कल्पनाही केली नव्हती. या संबंधात मोईनचे कुटुंबीयही काही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत.
---
---