पूर्वानुमानाचा ‘किसान ॲप’ अनेक शेतकऱ्यांना माहीतच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:09 IST2021-05-25T04:09:42+5:302021-05-25T04:09:42+5:30
नागपूर : शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाची वेळेत माहिती मिळावी यासाठी हवामान खात्याने गाजावाजा करून किसान ॲप सुरू केले आहे. मात्र ...

पूर्वानुमानाचा ‘किसान ॲप’ अनेक शेतकऱ्यांना माहीतच नाही
नागपूर : शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाची वेळेत माहिती मिळावी यासाठी हवामान खात्याने गाजावाजा करून किसान ॲप सुरू केले आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना हे ॲप माहीतच नाही. याऐवजी शेतकरी जिल्हा कृषी विभागाकडून पाठविल्या जाणाऱ्या एसएमएसचा वापर करतात.
अलीकडे वातावरणात बदल झाला आहे. अवेळी पाऊस, वादळ, वीज, मेघगर्जनेसह पाऊस असे अवकाळी वातावरण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी किसान ॲपचा वापर करतात का, याची माहिती घेतली असता अनेक शेतकऱ्यांना हा ॲप माहीतच नसल्याचे पुढे आले. याऐवजी मोजके शेतकरीच अन्य ॲप वापरतात. तसेच, जिल्हा कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना नियमित एसएमएस पाठविले जातात. त्यात नागपूर जिल्ह्यात १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांची नोंदणी असली तरी किती शेतकरी ते काळजीपूर्व वाचतात, याबद्दल शंकाच आहे.
...
हवामान खात्याचे विदर्भात ११९ ‘दामू’ केंद्र
नागपूर प्रादेशिक हवामान खात्याचे वैज्ञानिक (ई) गौतम नगराळ यांना यासंदर्भात विचारणा केली असता, विदर्भात ११९ ठिकाणी आमचे डिस्ट्रिक्ट ॲडव्हायझरी मेटॉलॉजिकल युनिट (दामू) असून, लाखो शेतकरी त्यासोबत जुळून असल्याचा दावा त्यांनी केला. जिल्हास्तरावर असलेल्या जिल्हा मोसम विभाग कार्यालयाच्या माध्यमातून ही यंत्रणा चालते, असे त्यांनी सांगितले.
...
किसान ॲपवर काय मिळते माहिती?
किसान ॲपवरून शेतकऱ्यांना पूर्वनुमान कळते. पाऊस कधी येणार, आर्द्रता किती असेल, ढगाळ वातावरण, पाऊस, वीज, वादळ आदी माहिती दिली जाते. मोबाईलवर ते डाऊनलोड करता येते. त्यावरील पूर्वानुमानावरून शेतकरी नियोजन करू शकतात.
...
शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
कृषी विभागाकडून आम्हाला मोबाईलवर एसएमएस येतात. त्याचा आम्ही उपयोग करतो. किसान ॲपबद्दल कल्पना नाही.
- सुधाकर वानखेडे, मारेगाव
..
किसान ॲप आम्ही मोबाईलमध्ये डाऊनलोड केलेला नाही. असा हवामान खात्याचा किंवा कृषी विभागाचा ॲप असल्याबद्दल कल्पना नाही.
- राहुल थूल, वारंगा
..
एम. किसान चॅनल ॲपचा आम्ही वापर करतो. मात्र कृषी विभागाच्या ॲपबद्दल कल्पना नाही. कृषी विभागाकडून आम्हाला एसएमएस येतात.
- श्याम भोयर, कोलार
...
कोट
एम. किसान चॅनल ॲपच्या माध्यमातून बीएसएनएलसोबत कृषी कार्यालयाने करार केला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, या सर्वांना पूर्वानुमानाचे आवश्यक तेवढे एसएमएस दिले जातात. त्याचा वापर शेतकऱ्यांनी करावा, अशी अपेक्षा आहे.
- मिलिंद शेंडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, नागपूर
...