राज्यघटनेचे प्रास्ताविक हाच रिपब्लिकन चळवळीचा जाहीरनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:24 IST2018-07-02T23:22:16+5:302018-07-02T23:24:31+5:30
रिपब्लिकन चळवळ ही केवळ राजकारणापुरती मर्यादित नाही. मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करणारी ती चळवळ आहे. राज्यघटनेचे प्रास्ताविक हाच रिपब्लिकन चळवळीचा जाहीरनामा आहे आणि त्यासाठी दिवंगत उमाकांत रामटेके आणि असंख्य नेते व कार्यकर्ते हे जीवनभर कार्यरत होते आणि असतात, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. जोगेंद्र कवाडे यांनी येथे कले.

राज्यघटनेचे प्रास्ताविक हाच रिपब्लिकन चळवळीचा जाहीरनामा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रिपब्लिकन चळवळ ही केवळ राजकारणापुरती मर्यादित नाही. मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करणारी ती चळवळ आहे. राज्यघटनेचे प्रास्ताविक हाच रिपब्लिकन चळवळीचा जाहीरनामा आहे आणि त्यासाठी दिवंगत उमाकांत रामटेके आणि असंख्य नेते व कार्यकर्ते हे जीवनभर कार्यरत होते आणि असतात, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. जोगेंद्र कवाडे यांनी येथे कले.
आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते दिवंगत उमाकांत रामटेके यांना सोमवारी सर्वपक्षीय जाहीर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. हिंदी मोरभवन सीताबर्डी येथील मधुरम सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अशोक गोडघाटे होते. तर गिरीश गांधी, गिरीश पांडव, रिपाइं(आ.)चे प्रदेशाध्यक्ष भूपेश थूलकर, अरुण वनकर, शिवसेनेचे शेखर सावरबांधे, मनसेचे हेमंत गडकरी, प्रभाताई रामटेके प्रमुख अतिथी होते.
प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले, राज्यघटनेचे फळ हे या देशातील १३० कोटी लोकांना कसे मिळतील, हा रिपब्लिकन चळवळीचा ध्यास होता आणि आहे. त्यासाठी रिपब्लिकन चळवळीतील प्रत्येक कार्यकर्ता हा काम करीत असतो. मग त्याच्यासोबत कुणी आला तर ठीक, नाही तर तो एकटाच प्रामाणिकपणे कार्यरत असतो. दिवंगत उमाकांत रामटेके यांनीसुद्धा आयुष्यभर आंबेडकरी चळवळीला अशाच प्रकारे मजबूत करण्याचे कार्य केले.
अशोक गोडघाटे, गिरीश गांधी, गिरीश पांडव, भूपेश थूलकर, अरुण वनकर, हरिदास टेंभुर्णे, हेमंत गडकरी, शंकर माणके, राजन वाघमारे, प्रकाश कुंभे, घनश्याम फुसे, दिनेश गोडघाटे, अरुण गजभिये, सेवक गजभिये, सिद्धार्थ पाटील आदींनीही आपले विचार व्यक्त करीत दिवंगत उमाकांत रामटेके यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
प्रास्ताविक राजू बहादुरे यांनी केले. संचालन अमृत गजभिये यांनी केले. सुधाकर टवळे यांनी आभार मानले.
रिपाइंचे ऐक्य व्हावे
यावेळी उपस्थित वक्त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या ताकदीवर प्रकाश टाकत रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. दिवंगत उमाकांत रामटेके यांनी आयुष्यभर रिपाइंच्या ऐक्यासाठी प्रयत्न केले. रिपाइंचे ऐक्य होणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असेही यावेळी सांगण्यात आले.