गोटाळीत घडून आले ‘मनोमिलन’
By Admin | Updated: May 7, 2017 02:09 IST2017-05-07T02:09:04+5:302017-05-07T02:09:04+5:30
सातत्याने तीन वर्षांपासून लहानसहान कारणांवरून वादविवाद, भांडण आणि संघर्ष होणाऱ्या भिवापूर तालुक्यातील

गोटाळीत घडून आले ‘मनोमिलन’
अभय लांजेवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : सातत्याने तीन वर्षांपासून लहानसहान कारणांवरून वादविवाद, भांडण आणि संघर्ष होणाऱ्या भिवापूर तालुक्यातील गोटाळी (मालेवाडा) येथे अखेरीस ‘मनोमिलन’ घडून आले. दोन्ही गटांनी उपस्थितांसमोर आपापल्या चुकांची कबुली देत एकमेकांना पेढ्यांचा घास भरवत या संघर्षाचा शेवट गोड केला. यामुळे क्षणभर वातावरण भावूक झाले होते. शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास उपोषण मंडपातच सुरू झालेली ही बैठक रात्री उशिरापर्यंत चालली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना खऱ्या अर्थाने आचरणात आणण्याची गरज असल्याचे विचार यावेळी अनेकांनी मांडले. दोन्ही गटाचे मनोमिलन घडविण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला, हे विशेष!
आपण सारे एक आहोत. संघटित आहोत, या भावनेतून नव्या जोमाने कामाला लागू, असा निर्धारही दोन्ही गटातून अभिव्यक्त झाला. आता आम्हास कुणीही भडकवू शकत नाही. वेगळे करू शकत नाही, असाही सूर चर्चेअंती दिसून आला. या निर्णयामुळे केवळ
‘बदनामी’चे कंगोरे बांधणाऱ्यांना जबरदस्त चपराक मिळाल्याच्या प्रतिक्रिया जनमानसात व्यक्त होत आहे.
विशेषत: लोकमतच्या वृत्तानंतर भारतीय बौद्ध महासभा, एम्बस आॅर्गनायझर, युवा नेते राजू पारवे आणि काही सामाजिक जाणिवांची जपणूक करणाऱ्या व्यक्तींनी या सत्कार्यासाठी पुढाकार घेतला. प्रशासकीय यंत्रणेनेही उत्तम सहकार्य दिले. राजू पारवे यांनी शुक्रवारी दुपारीच गोटाळी गाव जवळ केले. दोन्ही गटातील सदस्यांशी संवाद साधला. ‘समोर एक आणि पडद्याआड दुसरेच’अशी समाजविघातक खेळी न खेळता सुमारे दोन तास गोटाळी येथे अनेकांकडे प्रत्यक्ष भेट दिली. चला सकारात्मक मार्ग काढू या, अशी हाक दिली. सायंकाळच्या सुमारास चर्चा सुरू झाली. भारतीय बौद्ध महासभेनेही पुढाकार घेत दोन्ही गटांना समजाविण्याचाच पवित्रा घेतला. आता भांडायचेच झाले तर विकास कामांसाठी भांडू, अशाही प्रतिक्रिया या बैठकीत व्यक्त झाल्या. दोन्ही गटांनी आपापल्या चुकांची कबुली देत सकारात्मक भावनेतून आमच्यातील कटुता संपली, असे जाहीर करीत या प्रकरणाला पूर्णविराम दिला. लागलीच याच बैठकीत एकत्रितपणे बौद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम घेण्याचे सर्वानुमते ठरले. बैठकीतील उपस्थिती मुलांकडे लक्ष द्या. विधायक कामांना प्राधान्य द्या, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी यांनी यावेळी केले. चर्चेत भारतीय बौद्ध महासभेचे सुखदेव गायकवाड, चंद्रमणी पिल्लेवान, एम्बस्चे डॉ. पारस शंभरकर, डॉ. सी. जी. पाटील तसेच अॅड. प्रबुद्ध सुखदेवे, मुकेश गायगवळी, परसराम पिल्लेवान, इंद्रपाल गजघाटे, नारायण इंगोले, बाळू इंगोले, केशव ब्रम्हे, उमेश तिमांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जयस्वाल, तहसीलदार डी. जी. जाधव, ठाणेदार रवींद्र दुबे, राजू पारवे, विलास झोडापे आदींसह गावकरीही उपस्थित होते.
‘लोकमत’ने जोपासली सामाजिक बांधिलकी
एका वेगळ्या आणि नवीन विषयाला ‘लोकमत’ने हात घातला. ही सामाजिक परिवर्तनाची नांदी असल्याचे मत राजू पारवे, विलास झोडापे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. सोबतच बेधडकपणे ‘लोकमत’ने वास्तव मांडत दोन्ही गटांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे आणि शुभवर्तमानाची सामाजिक जबाबदारीही जोपासल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. ‘लोकमत’च हे घडवून आणू शकते, अशा शब्दातही त्यांनी कौतुक केले.