फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीने दिली गडकरींना धमकी; डायरीत मिळाली संवेदनशील माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2023 11:09 IST2023-01-16T11:03:00+5:302023-01-16T11:09:12+5:30
वहिनी-पुतण्याच्या खुनातील आरोपी

फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीने दिली गडकरींना धमकी; डायरीत मिळाली संवेदनशील माहिती
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयात फोन करून १०० कोटी रुपये न दिल्यास बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा झालेली आहे. याच शिक्षेत तो बेळगावच्या तुरुंगात आहे. तुरुंग आणि पोलिसांच्या तावडीतून तीन वेळा पळालेल्या या आरोपीची माहिती उजेडात आल्यानंतर पोलिस बारकाईने या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
जयेश ऊर्फ जपेश कांता एस ऊर्फ शाकीर ऊर्फ साहीर असे या आरोपीचे नाव आहे. शहर पोलिसांचे एक पथक बेळगावमध्ये जयेश आणि त्याच्या साथीदारांची चौकशी करीत आहे. शनिवारी सकाळी गडकरी यांच्या खामला येथील कार्यालयात जयेशने तीन वेळा फोन करून धमकी दिली होती. त्याने १०० कोटींची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास गडकरींना बॉम्बने उडविण्याची धमकी त्याने दिली होती. त्यानंतर गडकरींच्या कार्यालय आणि निवासस्थानाची सुरक्षा वाढविण्यात आली होती. फोन कॉलच्या तपासात जयेशची ओळख पटल्यानंतर आणि तो बेळगावच्या तुरुंगात असल्यामुळे पोलिसांचे पथक तातडीने बेळगावला पाठविण्यात आले.
जयेशने कर्नाटकच्या पुत्तूरमध्ये २ ऑगस्ट २००८ मध्ये आपला चुलतभाऊ लोहितची पत्नी सौम्या आणि तीन वर्षांच्या पुतण्याचा खून केला होता. दोघांचा खून करून त्याने सोन्याचे दागिने चोरी केले होते. खून करून पळून जात असताना त्याचा चुलतभाऊ लोहित तेथे पोहोचला होता. या घटनेच्या चार वर्षांनंतर ९ ऑक्टोबर २०१२ रोजी जयेश केरळात पोलिसांच्या हाती लागला. फरार असताना त्याने आपले नाव बदलून शाकीर ऊर्फ साहीर असे ठेवले होते. या प्रकरणात जयेशला २०१६ मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
जयेश कुख्यात आरोपी असून, तो विकृत स्वभावाचा आहे. त्याच्या विरुद्ध डझनभर गुन्हे दाखल आहेत. २०१८ ते २०२० दरम्यान तो तीन वेळा तुरुंग आणि पोलिसांच्या तावडीतून फरार झाला होता. तुरुंगात असताना त्याने बेळगावच्या पोलिस महानिरीक्षकांना फोनवरून धमकी दिली होती. त्यानंतर त्याला कडक निगराणीत ठेवण्यात आले होते. फाशीच्या यार्डात असूनही जयेश मोबाइल वापरत होता. तो मोबाइलवर इंटरनेटचा वापरही करीत होता. त्याने इंटरनेटवरूनच गडकरींच्या कार्यालयाचा नंबर मिळविल्याचा संशय आहे. त्याच्याजवळ एक डायरी असून, त्यात गडकरींच्या लँडलाईन, मोबाईल क्रमांकासह संवेदनशील माहिती आहे.
फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीजवळ अशा प्रकारची माहिती आणि मोबाइल आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. कुख्यात आरोपी असल्यामुळे जयेशला पोलिसांच्या कामकाजाची पद्धती माहीत आहे. तरीसुद्धा त्याने हे धाडस दाखविल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दोन सरकारची घ्यावी लागणार परवानगी
फाशीची शिक्षा झाल्यामुळे जयेशला नागपुरात आणण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुसऱ्या आरोपीप्रमाणे फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीला केवळ न्यायालयाच्या प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारावर ताब्यात घेता येत नाही. त्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य शासनाची परवानगी आवश्यक आहे.
स्थानिक संपर्काची चौकशी
जयेशजवळ आढळलेल्या डायरीत गडकरींचे कार्यालय आणि मोबाईल क्रमांक मिळाल्यामुळे पोलिस जयेशचा स्थानिक संबंध आहे काय याची चौकशी करीत आहेत. फरार असताना जयेश अनेक शहरात गेला होता. दरम्यान, तो नागपूरला आला होता काय किंवा तो येथील कोणाच्या संपर्कात होता काय याचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार पुण्याला गेल्यामुळे शनिवारी रात्री नागपुरात पोहोचले. त्यांनी अधिकाऱ्यांशी या प्रकरणावर चर्चा केली.