‘मेमू’चा प्रस्ताव रखडलेलाच!

By Admin | Updated: September 8, 2014 02:20 IST2014-09-08T02:20:28+5:302014-09-08T02:20:28+5:30

इतवारी रेल्वेस्थानकावर १३ तास रिकामे उभे राहणाऱ्या टाटा पॅसेंजरचा वापर करून कन्हान-कामठी-कळमना-इतवारी-नागपूर-बुटीबोरी-वर्धा आणि गोंदिया, ..

'MAMU' proposal is still pending! | ‘मेमू’चा प्रस्ताव रखडलेलाच!

‘मेमू’चा प्रस्ताव रखडलेलाच!

नागपूर : इतवारी रेल्वेस्थानकावर १३ तास रिकामे उभे राहणाऱ्या टाटा पॅसेंजरचा वापर करून कन्हान-कामठी-कळमना-इतवारी-नागपूर-बुटीबोरी-वर्धा आणि गोंदिया, चंद्रपूर दरम्यान ‘मेमू ट्रेन’ सुरू करण्याची मागणी ‘दपूम’ रेल्वेकडे करण्यात आली होती. परंतु हा मार्ग मध्य रेल्वेच्या अखत्यारित असल्यामुळे ‘दपूम’ रेल्वेने याबाबत मध्य रेल्वेला पत्र दिले होते. या पत्रावर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कुठलाच निर्णय घेतलेला नसल्याने हा प्रस्तावच रखडला आहे.
नागपूरचा झपाट्याने विकास होत असून शहराची मर्यादा २५ किलोमीटरपर्यंत वाढली आहे. मिहान, कार्गो हब, कळमना बाजार आणि व्यापाराचा विस्तार होत आहे. अशा परिस्थितीत रेल्वेची महत्त्वाची भूमिका आहे. शहराच्या विकासासाठी रेल्वेने कन्हान-कामठी-कळमना-इतवारी-नागपूर-बुटीबोरी-वर्धा दरम्यान मेमू गाडी सुरू करण्याची ‘दपूम’ रेल्वेच्या रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली होती. परंतु हा भाग मध्य रेल्वेच्या अखत्यारित येत असल्यामुळे ‘दपूम’ रेल्वेने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला मेमू गाडीबाबत पत्र दिले होते. या पत्रावर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कुठलीही भूमिका घेतलेली नाही. ही मेमू गाडी सुरू झाल्यास भविष्यात कळमना, इतवारी, अजनीत रेल्वेगाड्या संपवून तेथूनच रेल्वेगाड्या सुरू होऊ शकतात. शिवनाथ एक्स्प्रेस पूर्वी इतवारी रेल्वेस्थानकावरून सोडण्यात येत होती. परंतु नंतर ही गाडी नागपूरपर्यंत वाढविण्यात आली. कन्हान-बुटीबोरी-वर्धा मेमूसारखी पाच डब्यांची गाडी सुरू केल्यास शिवनाथ एक्स्प्रेसला नागपुरात आणण्याची गरज उरणार नाही. प्रवासी रेल्वे, बसने गाडी सुटण्याच्या वेळेपर्यंत स्टेशनवर पोहोचू शकतात. यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध वाहनांनी प्रवास करण्याचा त्रास होणार नाही, हे निश्चित. इतवारी-कटंगी फास्ट पॅसेंजर इतवारीला सकाळी ७ वाजता आल्यानंतर ही गाडी १४ तास रात्री ८ वाजेपर्यंत उभी राहते. नागपूर-गोंदिया हा प्रवास दोन तासांचा आहे. त्यामुळे ही गाडी मेमू फास्ट म्हणून चालविल्यास नागपूर-गोंदियाच्या दोन फेऱ्या होऊन मासिक पास धारकांची सोय होईल. सकाळी ८ वाजता ही गाडी सोडून दुपारी १ पर्यंत परत बोलविल्यास दुपारी १ ते ३ पर्यंत या गाडीच्या देखभालीचे काम होईल. ३ वाजता ही गाडी गोंदियाला जाऊन पुन्हा सायंकाळी ७ पर्यंत नागपूरला परत येईल. यामुळे दररोज गोंदिया-नागपूर ये-जा करणाऱ्यांची मोठी सोय या मेमू गाडीने होणार आहे.(प्रतिनिधी)

Web Title: 'MAMU' proposal is still pending!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.