मल्लिकाचा अर्ज अंतिम सुनावणीसाठी दाखल
By Admin | Updated: July 1, 2014 00:57 IST2014-07-01T00:57:32+5:302014-07-01T00:57:32+5:30
अंगप्रदर्शनामुळे सर्वत्र प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मल्लिका शेरावत ऊर्फ रिमा लांबाचा फौजदारी अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतला आहे.

मल्लिकाचा अर्ज अंतिम सुनावणीसाठी दाखल
हायकोर्ट : ‘जेएमएफसी’मधील खटल्याला आव्हान
नागपूर : अंगप्रदर्शनामुळे सर्वत्र प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मल्लिका शेरावत ऊर्फ रिमा लांबाचा फौजदारी अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतला आहे. या अर्जाद्वारे पांढरकवडा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात प्रलंबित खटल्याला आव्हान देण्यात आले आहे.
पांढरकवडा येथील शेतकरी रजनीकांत डालुराम बोरेले यांनी मल्लिका शेरावतच्या अंगप्रदर्शनाविरुद्ध २०१० मध्ये प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार अर्ज केला आहे. बोरेले नगर परिषदेचे माजी सदस्य आहेत. मल्लिकाने मर्डर, मान गये मुगल-ए-आजम अशा विविध हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. चित्रपटांत ती अत्यंत कमी वस्त्रांत वावरून कामुकपणा व बिनधास्तपणा दर्शविते. यामुळे प्रेक्षकांच्या कामुक भावना चाळवल्या जातात.
अत्याचारासारखे गंभीर गुन्हे घडण्यास व समाजस्वास्थ बिघडण्यास ही बाब कारणीभूत आहे. चित्रपट गीतांमध्ये मल्लिकाचे अंगप्रदर्शन पाहावल्या जात नाही. मासिक व वर्तमानपत्रांमध्ये तिची अश्लील छायाचित्रे प्रकाशित होत असल्याने कुटुंबीयांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होतो, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने तक्रारीची दखल घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली होती. यामुळे मल्लिकाने उच्च न्यायालयात धाव घेतली.
बोरेले यांची तक्रार व जेएमएफसीतील कारवाई रद्द करण्यात यावी, अशी तिची विनंती आहे. (प्रतिनिधी)