बनावट कागदपत्रे बनवून दीड कोटींचे कर्ज उचलले

By Admin | Updated: June 27, 2014 00:37 IST2014-06-27T00:37:32+5:302014-06-27T00:37:32+5:30

भूखंड आणि निवासाची बनावट कागदपत्रे तयार करून तिघांनी बँकेतून दीड कोटी रुपयांचे कर्ज उचलले. विशेष म्हणजे, या प्रकरणातील आरोपी आणि फिर्यादी हे सख्खे नातेवाईक आहेत.

Making a fake papers, he took one and a half million loans | बनावट कागदपत्रे बनवून दीड कोटींचे कर्ज उचलले

बनावट कागदपत्रे बनवून दीड कोटींचे कर्ज उचलले

भावानेच केला विश्वासघात : हुडकेश्वरमध्ये गुन्हे दाखल
नागपूर : भूखंड आणि निवासाची बनावट कागदपत्रे तयार करून तिघांनी बँकेतून दीड कोटी रुपयांचे कर्ज उचलले. विशेष म्हणजे, या प्रकरणातील आरोपी आणि फिर्यादी हे सख्खे नातेवाईक आहेत.
बिंदेश्वर नवरंगी शर्मा, प्रेम बिंदेश्वर शर्मा (वय २९, रा. उदयनगर चौक) आणि शंकर लक्ष्मीनारायण शर्मा अशी आरोपींची नावे आहेत. शर्मा यांचा फेब्रिकेटिंगचा व्यवसाय आहे.
बिंदेश्वर यांचे मोठे बंधू अरुण नवरंग शर्मा (वय ५१, पवनशक्तीनगर, वाठोडा) यांचे उदयनगर चौकाजवळ १७ आणि २४ क्रमांकाच्या भूखंडावर नवरंग निवास आहे. बिंदेश्वर आणि त्यांचा मुलगा प्रेम या दोघांनी त्याची बनावट कागदपत्रे तयार केली. ती शिक्षक सहकारी बँकेच्या महाल शाखेत जमा करून या भूखंडावर १ कोटी ४६ लाखांचे कर्ज उचलले. कर्जाची रक्कम उचलण्यापूर्वी बापलेकाने शंकर लक्ष्मीनारायण शर्मा यांना अरुण शर्मा म्हणून बँकेच्या अधिकाऱ्यांसमोर उभे केले. आरोपींनी सुरुवातीला कर्जाची परतफेड केली, नंतर मात्र कर्जाची रक्कम थकली. त्यामुळे बँकेने अरुण शर्मा यांच्याशी पत्रव्यवहार केला. प्रतिसाद न मिळाल्यामुळे बँकेने कर्ज वसुलीची प्रक्रिया सुरू केली. मे महिन्यात प्रत्यक्ष अरुण शर्मा यांची भेट घेतली तेव्हा ही बनवाबनवी उघड झाली. आपल्या निवासाची आपल्याच भावाने बनावट कागदपत्रे तयार करून ती बँकेत गहाण ठेवली आणि दीड वर्षांपूर्वी तब्बल दीड कोटींचे कर्ज उचलल्याचे स्पष्ट होताच अरुण शर्मा यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी बिंदेश्वर, त्यांचा मुलगा प्रेम आणि शंकर शर्मा या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यापैकी प्रेम याला पोलिसांनी अटक केली. या फसवणुकीत बँकेतील कुणी कर्मचारी सहभागी आहेत काय, त्याचाही तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Making a fake papers, he took one and a half million loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.