राज्यात आयुर्वेद विद्यापीठ व्हावे
By Admin | Updated: October 10, 2015 03:15 IST2015-10-10T03:15:15+5:302015-10-10T03:15:15+5:30
महाराष्ट्रात आयुर्वेद विद्यापीठ झाले पाहिजे, या संदर्भात शासन सकारात्मक विचार करेल.

राज्यात आयुर्वेद विद्यापीठ व्हावे
देवेंद्र फडणवीस : श्री आयुर्वेद महाविद्यालयातर्फे रसाचार्यांचा सत्कार
नागपूर : महाराष्ट्रात आयुर्वेद विद्यापीठ झाले पाहिजे, या संदर्भात शासन सकारात्मक विचार करेल. या विद्यापीठाचे मॉडेल कसे असावे, ते पूर्णत: सरकारी विद्यापीठ असावे की, आयुर्वेद क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत संस्थांनी व व्यक्तींनी एकत्र येऊन स्थापन करावे किंवा विद्यापीठ कायद्याअंतर्गत स्थापन व्हावे याबाबत शासन स्तरावर विचार करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
श्री आयुर्वेद महाविद्यालयाच्या सुवर्ण जयंती महोत्सवाअंतर्गत सुवर्ण जयंती स्मरणिका ‘बखरश्रीची ’चे प्रकाशन तसेच १७ रसाचार्यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय वैद्यक समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश शर्मा हे होते.
मुख्यमंत्री म्हणाले, आयुर्वेद हे अतिप्राचीन उपचाराचे शास्त्र आहे, जेव्हा ‘मॉडर्न मेडिसीन’ नव्हती त्यावेळी आयुर्वेदाद्वारेच उपचार व्हायचे. परंतु सध्याच्या ‘मॉडर्न मेडिसीन’च्या जगात आयुर्वेदाला पूर्वीचे स्थान राहिले नाही. संपूर्ण जग आयुर्वेदाकडे वळत असताना, देशातील आयुर्वेद पॅथीवरील आपला विश्वास कमी झाला आहे. आयुर्वेद शास्त्रात अधिक संशोधन होण्याची गरज आहे. एखाद्या रोगाच्या मुळाशी जाऊन तो रोग पूर्णपणे नष्ट करण्याची ताकद आयुर्वेदात आहे. जिथे अॅलोपॅथी उपचार अपुरे पडतात त्यानंतर आयुर्वेदाकडे वळलेले अनेक रुग्ण दीर्घ उपचारानंतर बरे झालेले आहेत. त्यामुळे आपल्या देशाने आयुर्वेदाचे महत्त्व ओळखून ते सामान्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविक भारतीय वैद्यक समन्वय समितीचे सचिव डॉ. गोविंदप्रसाद उपाध्याय यांनी केले. त्यांनी श्री आयुर्वेद महाविद्यालयासंदर्भातील अडचणी मांडत, नागपुरात स्वतंत्र आयुष विद्यालय निर्माण करण्याची मागणी केली. कार्यक्रमात ‘बखरश्रीची’ या स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. संचालन वैद्य संदीप शिरवळकर यांनी केले. कार्यक्रमाला वैद्य वेदप्रकाश शर्मा, वैद्य सीताराम शर्मा, वैद्य मृत्युंजय शर्मा, डॉ. उपेंद्र कोटेकर, प्राचार्या वैद्य मनीषा कोटेकर, रमण बेलगे, ब्रजेश मिश्रा, वैद्य रचना रामटेके उपस्थित होते. (प्रतिनिधी)