गुजरातमध्ये बहुमत, पण जागा घटण्याचे संघधुरिणांनी केले होते भाकीत : मतदानवाढीसाठीचे प्रयत्न ठरले अपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 06:38 PM2017-12-18T18:38:50+5:302017-12-18T18:39:23+5:30

गुजरात निवडणुकांच्या निकालासंदर्भात बहुतांश ‘एक्झिट पोल’चे आकडे चुकीचे ठरले व १०० जागा मिळविताना पक्षाची दमछाक झाली.

A majority in Gujarat, but Inadequate efforts to increase the number of polling | गुजरातमध्ये बहुमत, पण जागा घटण्याचे संघधुरिणांनी केले होते भाकीत : मतदानवाढीसाठीचे प्रयत्न ठरले अपुरे

गुजरातमध्ये बहुमत, पण जागा घटण्याचे संघधुरिणांनी केले होते भाकीत : मतदानवाढीसाठीचे प्रयत्न ठरले अपुरे

Next
ठळक मुद्देमतदानवाढीची ‘बेरीज वजाबाकी’ चुकली

योगेश पांडे

आॅनलाईन लोकमत
नागपूर : गुजरात निवडणुकांच्या निकालासंदर्भात बहुतांश ‘एक्झिट पोल’चे आकडे चुकीचे ठरले व १०० जागा मिळविताना पक्षाची दमछाक झाली. मात्र पक्षासमोर हीच स्थिती उद्भवणार असल्याचे भाकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अभ्यासातून समोर आले होते. याबाबत संघधुरिणांनी सार्वजनिकपणे वक्तव्य केले नव्हते. मतदान न वाढल्यामुळे भाजपला बहुमत मिळेल, मात्र मागील वेळच्या तुलनेत जागा घटतील हे संघाचे पदाधिकारी अंतर्गत गोटात दाव्याने सांगत होते. नेमकी हीच बाब खरी ठरली असून संघाचे गणित बरोबर निघाल्याचे दिसून येत आहे.
गुजरातला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यात संघाची मौलिक भूमिका राहिलेली आहे. लोकसभा निवडणुकांच्या वेळी संघ स्वयंसेवकांनी उत्तर प्रदेशसह गुजरातमध्येदेखील सक्रियपणे प्रचार केला होता व त्यांचे निकाल जगाने पाहिले होते. त्यानंतर प्रत्येक राज्यात संघ सक्रिय प्रचारापासून दूर राहिला. परंतु मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी संघाने बरेच प्रयत्न केले.
गुजरातमध्येदेखील मतदानाचा टक्का वाढावा व भाजपासाठी सकारात्मक वातावरणनिर्मिती व्हावी, यासाठी संघ परिवाराच्या विविध संस्थांना पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभत होते. संघ परिवाराशी जुळलेल्या कुटुंबातून १०० टक्के मतदान झाले पाहिजे यासाठी स्वयंसेवक व प्रचारक कामाला लागले होते. स्वयंसेवकांनी भाजपाचे नाव घेऊन प्रचार न करता तरुणांमध्ये मतदानाबाबत जागरुकता निर्माण करण्यावर भर दिला व ‘हर घर, एक व्होट’ ही मोहीमच राबविण्यात आली. संघाच्या वरिष्ठ पातळीहून यासाठी विशेष नियोजनदेखील करण्यात आले होते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला पाहिजे, अशी सूचनादेखील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मागील वर्षीच केली होती.
एकीकडे स्वयंसेवक मतदानवाढीसाठी प्रयत्न करत असताना संघाने अंतर्गत सर्वेक्षणदेखील केले होते. यानुसार मतदानाच्या पहिल्या टप्प्यात केवळ ६६.७५ टक्के मतदान झाल्यानंतर संघाच्या एका राष्ट्रीय पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही भाजपसाठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले होते. जर दुसऱ्या फेरीत मतदानाची टक्केवारी अशीच राहिली तर पक्षाला बहुमत मिळेल, मात्र शंभरी गाठताना दमछाक होईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. जर मतदानाचा आकडा ७२ टक्क्यांहून अधिक गेला तरच ११५ हून अधिक जागा येतील, असे ते म्हणाले होते.

मतदानवाढीची ‘बेरीज वजाबाकी’ चुकली
गुजरातमध्ये मतदानवाढीसाठी संघाचे प्रयत्न अपुरे पडले. २०१२ च्या निवडणुकांत गुजरातमध्ये ७१.३२ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यंदा मतदानाचा आकडा वाढेल हा संघाचा अंदाज फोल ठरला. गुजरातमध्ये दोन्ही टप्प्यांत सरासरी ६८.४१ टक्केच मतदान झाले आणि येथेच जागांचे गणित बिघडले. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: A majority in Gujarat, but Inadequate efforts to increase the number of polling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.