लष्कराच्या ताब्यातून मेजर पुन्हा झाला फरार; विमानतळावरून घेतले होते ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 03:09 PM2023-08-04T15:09:03+5:302023-08-04T15:10:17+5:30

जारी झाली होती ‘लूक आऊट नोटीस’

Major who was taken into custody from the airport absconded again from army | लष्कराच्या ताब्यातून मेजर पुन्हा झाला फरार; विमानतळावरून घेतले होते ताब्यात

लष्कराच्या ताब्यातून मेजर पुन्हा झाला फरार; विमानतळावरून घेतले होते ताब्यात

googlenewsNext

नागपूर : सैन्याने फरार घोषित केलेल्या एका मेजरला ताब्यात घेतल्यानंतर दोन दिवसांतच तो परत फरार झाला आहे. कामठी येथील गार्ड्स रेजिमेंटल सेंटर येथून तो फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. यासंदर्भात सैन्याच्या अधिकाऱ्यांकडून जुनी कामठी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

मेजर राजीव धालसिंह बोपचे (३५, सिवनी, मध्यप्रदेश) असे संबंधित फरारी अधिकाऱ्याचे नाव आहे. बोपचेची पंजाब येथील भटिंडा येथे पोस्टिंग होती व फेब्रुवारी २०२० मध्ये सैन्याकडून बोपचेला फरार घोषित करण्यात आले होते. तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता व त्याच्याविरोधात ‘लूक आऊट नोटीस’ जारी करण्यात आली होती. २९ जुलै रोजी इमिग्रेशन विभागाने बोपचेला विमानतळावरून ताब्यात घेतले व त्यानंतर त्याला सोनेगाव पोलिस ठाण्याच्या पथकाला सोपविले. पोलिसांनी याची सूचना गार्ड्स रेजिमेंटल सेंटरला दिली होती. तेथील अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी सायंकाळी त्याचा ताबा घेतला व त्याला सेंटरमधील ऑफिसर्स मेसमध्ये ठेवण्यात आले होते.

३० जुलै रोजी त्याला भेटण्यासाठी त्याची आई व भाऊ संदेश हे आले होते. ते सायंकाळी परतल्यानंतर बोपचे त्याच्या खोलीतच होता व बाहेर पहारा होता. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तो बाथरूममध्ये गेला व तेथील ग्रिल तोडून त्याने पळ ठोकला. सैन्याकडून फरार झालेला मेजर ताब्यात घेतल्यानंतर परत फरार झाल्याने खळबळ उडाली. अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जुनी कामठी पोलिस ठाण्यात बोपचेविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून शोध सुरू आहे.

Web Title: Major who was taken into custody from the airport absconded again from army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.