बुटीबोरीच्या मुख्य चौकात खुलेआम मद्यपान

By Admin | Updated: December 8, 2014 00:51 IST2014-12-08T00:51:32+5:302014-12-08T00:51:32+5:30

पंचतारांकित एमआयडीसी अशी ओळख असलेल्या बुटीबोरीची सध्या नवी ओळख बनू पाहात आहे. मुख्य चौकालगत खुलेआम दारू पिण्याचा प्रकार सुरू असतो. दारुड्यांसाठी पाणी, ग्लास यासह इतरही

In the main square at Butibori's main square, openly drinking | बुटीबोरीच्या मुख्य चौकात खुलेआम मद्यपान

बुटीबोरीच्या मुख्य चौकात खुलेआम मद्यपान

विद्यार्थ्यांसह प्रवासी त्रस्त : दारुड्यांचा भररस्त्यावर सुरू असतो धिंगाणा
गणेश खवसे - नागपूर
पंचतारांकित एमआयडीसी अशी ओळख असलेल्या बुटीबोरीची सध्या नवी ओळख बनू पाहात आहे. मुख्य चौकालगत खुलेआम दारू पिण्याचा प्रकार सुरू असतो. दारुड्यांसाठी पाणी, ग्लास यासह इतरही आवश्यक व्यवस्था तेथे किरकोळ विक्रेत्यांनी केलेली आहे. या ठिकाणापासून बसस्थानक, शाळा एवढेच काय तर पोलीस स्टेशनही हाकेच्या अंतरावर असून दारुड्यांचा भररस्त्यावर धिंगाणा सुरू असतो. परिणामी विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम पडतो तर प्रवाशांना मुकाटपणे सर्व सहन करावे लागते. या प्रकाराकडे कुणीच कसे काय लक्ष देत नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
कामगारांची संख्या मोठी
बुटीबोरीत मोठ्या संख्येने कामगार राहतात. एमआयडीसीतील कंपनी, कारखान्यात काम केल्यानंतर ते सायंकाळच्या सुमारास या अड्ड्यावर येतात. सायंकाळी जणू येथे यात्रा भरल्याचे दृश्य दिसते. त्यातही शुक्रवारी बुटीबोरीचा आठवडी बाजार राहत असल्याने आजूबाजूच्या गावातील नागरिकही तेथे दिसून येतात. बारऐवजी दुकानातून दारू विकत घेणे आणि बाहेर ठेल्यावर येऊन ऐशोआरात ती पित बसणे असा अनोखा उद्योग त्यांचा सुरू असतो.
असे कुठवर चालणार?
मुख्य चौकालगत हा प्रकार सुरू असताना त्याला आळा घालण्यासाठी ना बुटीबोरी ग्रामपंचायत पुढाकार घेत, ना शाळेचे व्यवस्थापन. सर्वसामान्य नागरिक तरी करणार काय, म्हणून ते चूप बसतात. या ठिकाणापासून पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे, एवढेच काय तर मुख्य चौकात वाहतूक पोलीस तैनात असतात. त्यांच्याही निदर्शनास हा प्रकार येतो. मात्र तेसुद्धा काहीच हरकत नोंदवित नाही. परिणामी दारुडे असे कृत्य बिनधास्तपणे करतात. बुटीबोरी पोलिसांनी कोणत्या कारणांनी चुप्पी साधली आहे, हे कळायला मार्ग नाही.
१०० मीटरवर शाळा
अवैध दारू पिण्याच्या या अड्ड्यापासून होलीक्रॉस कॉन्व्हेंट, छत्रपती शिवाजी विद्यालय हे १०० मिटरच्या आत आहे. दारू पिण्याचा प्रकार हा सकाळपासूनच सुरू होतो. त्यामुळे त्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हे सर्व दृश्य दिसते. एखादवेळ भांडण, मारहाण झाल्यास त्याचाही आवाज या शाळेपर्यंत पोहोचतो. परिणामी विद्यार्थ्यांवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. वास्तविक, शाळेच्या १०० मीटर अंतरापर्यंत दारूचे दुकान, बीअर बार, वाईन शॉप असू नये असा नियम सांगतो. मात्र बुटीबोरीतील या दोन बीअर बार, देशी दारू दुकान आणि वाईन शॉपसाठी वेगळा नियम लावण्यात आला काय, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो.
बुटीबोरी रस्त्यावर मुख्य चौकापर्यंत एकूण सहा बार, देशी दारूची दोन दुकाने, वाईन शॉप आहेत. याशिवाय छुप्या पद्धतीने अवैध दारुविक्री केली जाते. विशेष म्हणजे बुटीबोरी येथे नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक दारूविक्री होत असल्याची माहिती आहे. मुख्य चौकात दोन बीअर बार आहेत. देशी दारूचे दुकान, वाईन शॉप आहेत. त्यापैकी वाईन शॉप आणि देशी दारूच्या दुकानातून दारू घेतली घेतले. या वाईन शॉप, देशी दारू दुकानाबाहेर अगदी समोरासमोर हातठेल्यावर चिवडा, पाणी पाऊच, निंबू, यासह इतर साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. केवळ एवढेच नव्हे तर दारू पिणाऱ्यांसाठी प्लास्टिकचे ग्लाससुद्धा अशा किरकोळ साहित्य विक्रेत्यांकडून उपलब्ध करून दिले जाते. असे चिवडा आणि साहित्य हातठेल्यांवरून विकणारे तेथे २० पेक्षा अधिक विक्रेते आहेत, हे विशेष!
दुकानातून दारू घेतली की थेट हातठेला गाठला जातो. तेथे खुलेआमपणे दारूचा घोट घेतला जातो. दारू पिल्यानंतर दारूडे तेथेच बराच वेळ झिंगत असतात. त्यानंतर ते या ठिकाणापासून ३०-३५ फुटांवर असलेल्या बुटीबोरीच्या मुख्य चौकात येतात. तेथेच बसस्थानकही आहे. तेथे शिव्याशाप, धिंगाणा प्रसंगी मारहाणीचा प्रकार घडतो. शेकडो नागरिकांना असा प्रसंग नजरेस पडतो. ही येथील नित्याची बाब झाली आहे. मात्र दारुड्यांशी हुज्जत घालणार कोण, असा विचार करीत प्रत्येक नागरिक तेथून मुकाट्याने निघून जातो.
प्रवाशांना तर तेथे काही वेळ घालवावा लागतो. त्यामुळे तेसुद्धा मुकाटपणे हा प्रकार सहन करतात. परंतु ही गंभीर बाब अशीच पुढे सुरू राहणार का, असा यानिमित्ताने प्रश्न उपस्थित होतो.

Web Title: In the main square at Butibori's main square, openly drinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.