माझिया रक्तासवे अन् जागली माझी लढाई...!

By Admin | Updated: November 19, 2014 00:48 IST2014-11-19T00:48:14+5:302014-11-19T00:48:14+5:30

रुपाताई कुळकर्णी एक सरळ, साधे, निगर्वी व्यक्तिमत्त्व. चेहऱ्यावर सतत हास्य आणि समाधान असलेल्या रुपाताईंच्या आत मात्र कामाचा झपाटा आहे. प्रचंड चिवटपणा आहे. समाजसेवेचे ग्लॅमर पांघरणारी

Maia bloodsaw and Jogali fight for me ...! | माझिया रक्तासवे अन् जागली माझी लढाई...!

माझिया रक्तासवे अन् जागली माझी लढाई...!

विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड : रूपाताई कुळकर्णी यांचा सत्कार
नागपूर : रुपाताई कुळकर्णी एक सरळ, साधे, निगर्वी व्यक्तिमत्त्व. चेहऱ्यावर सतत हास्य आणि समाधान असलेल्या रुपाताईंच्या आत मात्र कामाचा झपाटा आहे. प्रचंड चिवटपणा आहे. समाजसेवेचे ग्लॅमर पांघरणारी अनेक माणसे आपल्या आजूबाजूला असताना रुपाताई शांतपणे आपले कार्य करीत राहतात. संस्कृतच्या पंडित, प्रचंड विद्वत्ता, संगीताच्या दर्दी मर्मज्ञ आणि सामाजिक कार्यासाठी स्वत:ला झोकून देणाऱ्या रुपाताई कुठल्याच सन्मानाने मोठ्या होणाऱ्या नाहीत. पुरस्कार त्यांच्या नावाने सन्मानित व्हावा, अशा रुपाताईंचा आज छोटेखानी कौटुंबिक सत्कार करण्यात आला.
आपला सत्कार होणार हे रुपाताईंना माहीतच नव्हते. कारण त्या सत्कार स्वीकारणार नाहीत, ही खात्री त्यांच्या चाहत्यांना होती. त्यामुळे दुसऱ्याच कारणाने रुपाताईंना बोलावून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने डॉ. गिरीश गांधी यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी रुपाताईंचे चाहते निवडक मित्रमंडळी उपस्थित होते. खरे तर रुपाताईंना यंदांचा स्मिता स्मृती सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण त्यांनी यानंतर कुठलाही सन्मान स्वीकारणार नाही, असेच साऱ्यांना ठणकावून सांगितले. गिरीश गांधींचा मात्र त्यांना आग्रह होता. मला कुठलेच पुरस्कार यानंतर का स्वीकारायचे नाही, हे सांगण्यासाठी त्या गिरीशभाऊंना भेटायला आल्यात आणि त्यांच्या नकळतच हा सत्कार त्यांना प्रेमापोटी स्वीकारावा लागला. हा हृद्य सोहळा आज आठवणीत राहणारा होता. उपेक्षित घरकामगार आणि मोलकरणींसाठी लढा उभारणाऱ्या रुपाताई साऱ्याच झगमगाटापासून दूर राहणाऱ्या आहेत. फार संकोच बाळगत त्यांनी सन्मानाची शाल, श्रीफळ स्वीकारले.
मग काय...सारेच मित्रमंडळी होते. जुन्या आठवणींची मैफिल गप्पांच्या ओघात कधी रंगली ते कळलेच नाही. जयप्रकाश नारायण, पु. ल. देशपांडे, पं. कुमार गंधर्व, विं. दा. करंदीकर, वसंतराव देशपांडे यांच्या अनेक आठवणी रुपाताईंनी सांगितल्या. सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या रुपाताई उत्तम गायिका आहेत, हे अनेकांना ठाऊक नाही. त्यांना पं. वसंतरावांनी गाणे शिकण्यासाठी बोलाविले होते. पण रुपाताईंच्या हातून त्यापेक्षा मोठे काम उभे राहणार होते. सत्कार स्वीकारल्यावर रुपाताई म्हणाल्या, खरे तर मी काहीही केलेले नाही. माझे वडील माझ्यापेक्षा पंधरापट पुरोगामी होते. त्यांचा संस्कारच माझ्या कामी आला. उपेक्षितांसाठी काम करताना फार त्रास झाला. अनेकांनी हिणवलेही पण माझी तयारी होती.
शरद पवारांनी मोलकरणींसाठी कायदा करण्यात खूप सहकार्य केले. कुठल्याही पक्षाचे सरकार असले तरी त्यांनी मदत केली. गप्पांचा फड रंगात आला होता. गिरीश गांधी यांनीही यावेळी स्मिता पाटील, जेपी, संजय गांधी यांच्या अनेक आठवणींसह विद्यार्थी चळवळीपासून रुपाताईंचा प्रवास सांगितला.
स्वाभाविकपणे अनौपचारिक गप्पांमध्ये रुपाताईंना गायनाचा आग्रह झाला. त्या नाकारत होत्याच पण आग्रहापुढे त्यांचे काही चालले नाही. ‘शृंखला पायी असु दे मी गतीचे गीत गाईन, दु:ख उधळायास आता आसवांना वेळ नाही, माझीया रक्तासवे अन् जागली माझी लढाई...’ या बाबा आमटेंनी लिहिलेल्या गीतांनी सारे वातावरण शांत झाले. आपुलकीच्या टाळ्या आणि दादही झाली. गप्पांचा ओघ जरा आवरता घेत त्यांनी निरोप घेतला. यावेळी गिरीश गांधी यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश खरात, अरुणा सबाने, रमेश बोरकुटे, किरण मेश्राम, प्रगती पाटील, मनिषा साधू, कवी शिव, माधव सोलव, हिरामण लांजे, रवी घाडगे, हरिश दिकोंडवार, श्रीराम काळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Maia bloodsaw and Jogali fight for me ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.