माहुतांचा जहालपणा नडला!
By Admin | Updated: June 1, 2015 00:20 IST2015-05-31T23:13:01+5:302015-06-01T00:20:24+5:30
समर्थ हत्ती मृत्यू : ‘भीम’बाबत काळजी घेणे गरजेचे, पट्टीत खिळे मारून प्रशिक्षण

माहुतांचा जहालपणा नडला!
अनंत जाधव -सावंतवाडी --जिल्ह्यात दुसऱ्यांदा राबविलेली हत्ती पकड मोहीम यशस्वी झाल्यानंतर वनविभागाने हत्तींना सिंधुदुर्गमध्येच प्रशिक्षित करण्याचे केलेले धाडस वनविभागाच्या अंगलट आले आहे. मुक्तसंचार करणाऱ्या हत्तीला कैद्यासारखे बंदिवान करून त्याला माहुतांनी दिलेले जहाल प्रशिक्षणही हत्तीच्या मृत्यूला तेवढेच कारणीभूत आहे. पट्टीत खिळे मारून त्यांच्या पायावर मारले जायचे. पायाच्या जखमेतून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. जखमाच समर्थच्या प्राणावर बेतल्या. त्यामुळे आता भीम या हत्तीला येथून हलवणे गरजेचे बनले आहे.
जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी तत्कालीन उपवनसंरक्षक नरेश झुरमुरे यांनी हत्ती पकड मोहीम राबविली होती. मोहीम संपूर्ण महाराष्ट्रासाठी उत्सुकतेचा विषय होता, पण मोहिमेवेळी पकडलेल्या हत्तीला औषधाचा जादा डोस लागला आणि तो दोन दिवसांनी मृत पावला. त्यानंतर हत्ती पकड मोहीमच थांबविली होती.
उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी मागचा इतिहास विसरून पुन्हा एकदा नव्या दमाने मोहीम राबविण्याचे निश्चित केले. यासाठी कर्नाटकातून खास चार हत्तीही आणण्यात आले. या हत्तींच्या सहाय्याने माणगाव खोऱ्यातील हत्ती पकड मोहीम यशस्वीही केली. पण या मोहिमेला गालबोट लागले ते पकडलेल्या
हत्तींना प्रशिक्षित करण्यासाठी आंबेरी येथे ठेवण्यात आले तेव्हा. ना
सुविधा ना पुरेशी जागा, योग्य हवामान. याचा सारासार विचार केला तर हत्ती प्रशासनाच्या दुर्लक्षतेचेच बळी ठरले.
समर्थच्या डाव्या पायाला जखम झाली होती. पायात ट्रेस होता. त्यामुळेच तो मृत पावला. अशी कारणे प्राथमिक वैद्यकीय अहवालात डॉक्टरांनी दिली आहेत. मुख्य अहवाल दोन दिवसात आल्यानंतर खरे कारण पुढे येईल.
- एस. रमेशकुमार,
उपवनसंरक्षक
५क्रॉलसाठीची जागा तोकडी
जंगली हत्ती हा मुक्तपणे संचार करणारा प्राणी. त्याला अचानक ५ बाय ५ च्या क्रॉलमध्ये ठेवण्यात आले. त्यामुळे त्याच्यासाठी ती जागा अतिशय तोकडी होती. त्यातच या हत्तींना सध्याच्या तीव्र उन्हाळ्यात पुरेसे पाणी मिळत नव्हते. हत्तीच्या खाद्याबाबतही अनेक तक्रारी होत्या. या सर्व कारणांमुळे हत्तींचे जीवन बंदिवानासारखे झाले होते. त्यामुळेच गणेश व समर्थचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे.
पहिल्या हत्तीच्या मृत्यूनंतर शासनाकडून दखल नाही
गणेश हत्तीचा १० एप्रिलला मृत्यू झाला. तेव्हा वनविभागाने हत्ती इतरत्र हलविणे गरजेचे होते. समर्थचे आजारपणही वाढत चालेले होते. वन विभागाने तसे शासनाला कळविलेही होते, पण आपले मरण दुसऱ्यावर ढकलतात या युक्तीप्रमाणे इतर अधिकाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली नाही. त्यामुुळे आज दुसऱ्याही हत्तीला गमावण्याची वेळ आली आहे.
माहुतांचे जहाल प्रशिक्षण
कर्नाटकमध्ये जंगली हत्तींना प्रशिक्षित करताना त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण दिले जाते तसेच प्रशिक्षण आंबेरीत पकडून ठेवलेल्या हत्तींना दिले होते. १६ फेबु्रवारीला तिसरा हत्ती पकडला, तेव्हापासून या माहुतांकडून प्रशिक्षण सुरू झाले. हे प्रशिक्षण मुक्त वातावरणात माणसावर अधिराज्य गाजवणाऱ्या हत्तींसाठी जीवघेणे ठरले. काठीला लांब खिळे मारून ते हत्तीच्या अंगावर मारायचे. यातच हृदयविकाराने गणेशचा मृत्यू झाला, तर समर्थच्या पायावर झालेल्या जखमा बऱ्याच झाल्या नाहीत व त्याचाही मृत्यू ओढवला.