लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज कामगार संघटनांच्या तीव्र विरोध आणि संपाच्या इशाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर महावितरणने आपल्या ३१९ उपकेंद्रांचे खासगीकरण केले आहे. यासाठी क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड आणि स्मार्ट सर्व्हिसेस या दोन खासगी कंपन्यांना अनुक्रमे १६५ आणि १६४ उपकेंद्रांची जबाबदारी देण्यात आली आहे. या कंपन्या आता मनुष्यबळ पुरवणार असून, देखभाल व वीजहानी नियंत्रणाची जबाबदारीही त्यांच्यावर असेल.
महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, २६ डिसेंबर २०२४ रोजी या खासगीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्याअंतर्गत यंदाच्या ऑगस्ट महिन्यात ३६ महिन्यांसाठी ही उपकेंद्रे दोन्ही कंपन्यांकडे सोपविण्यात आली. क्रिस्टल कंपनीला नागपूरसह अमरावती, भांडुप, बारामती, जळगाव, कल्याण, कोल्हापूर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी येथील उपकेंद्रे दिली गेली आहेत. दुसरीकडे, स्मार्ट सर्व्हिसेसला गोंदिया, चंद्रपूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर जिल्ह्यामध्ये काम देण्यात आले आहे. या कंपन्यांना तीन शिफ्टसाठी एक-एक ऑपरेटर आणि हाऊसकीपर नियुक्त करणे बंधनकारक असून तांत्रिक देखभालीची जबाबदारीही त्यांच्यावर असणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी सर्कल पातळीऐवजी केंद्रीय निविदा प्रक्रियेद्वारे उपकेंद्रे खासगी संस्थांकडे सोपविण्यात आली आहेत. देखभाल व्यवस्थेतील त्रुटींवर दंडात्मक कारवाई होईल तर वीजहानी कमी केल्यास कंपन्यांना प्रोत्साहन रक्कम देण्यात येणार आहे.
नागपुरातील २५ उपकेंद्रे क्रिस्टलकडेक्रिस्टलला नागपूर जिल्ह्यातील एकूण २५ उपकेंद्रे देण्यात आली आहेत. यामध्ये मौदा व सावनेर येथील प्रत्येकी ५, उमरेडमधील ४, काटोलमधील १ तसेच नागपूर शहरातील सिव्हिल लाइन्स विभागातील ४ व एमआयडीसीमधील ४ उपकेंद्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, क्रिस्टल कंपनी आधीपासूनच नागपूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात स्वच्छता कर्मचारी पुरवण्याचे काम करते. याच ठिकाणी मागील काही महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी शिवसेना (उबाठा) च्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते.
नियुक्तीपूर्वीच राजीनाम्याची अट ?दरम्यान, उपकेंद्रांवर आधीच कार्यरत असलेल्या आउटसोर्स कर्मचाऱ्यांकडून पुन्हा नोकरी देण्यासाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगार संघटनेने केला आहे. क्रिस्टल कंपनीकडून नियुक्तीपूर्वी राजीनामा देण्याची अट घातली जात असल्याचा दावा संघटनेने केला आहे. तसेच साप्ताहिक सुटी व अन्य लाभ मिळणार नसल्याचे लेखी स्वरूपात घेण्याची सक्ती केली जात असल्याचेही आरोप आहेत. यासंदर्भात रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांना निवेदन देण्यात आले. संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे यांच्यासह अनिवेश देशमुख, निशांत काळसर्पे, विकास ठुसे, जयपाल हटवार, प्रफुल्ल डोये आदी उपस्थित होते. संघटनेचा आरोप आहे की, क्रिस्टल ही कंपनी भाजपचे माजी आमदार प्रसाद लाड यांच्याशी संबंधित आहे.