मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्यांविरोधात महावितरण आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 21:38 IST2018-06-01T21:38:12+5:302018-06-01T21:38:29+5:30
मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध महावितरणने आक्रमक धोरण अवलंबिले असून मुख्यालयी राहत नसलेल्या तब्बल ८१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे घरभाडे गोठविण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. याशिवाय यापूर्वी घरभाडे भत्ता गोठवूनही मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ३५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्यावर कार्यवाही का करण्यात येऊ नये या आशयाची कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.

मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्यांविरोधात महावितरण आक्रमक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध महावितरणने आक्रमक धोरण अवलंबिले असून मुख्यालयी राहत नसलेल्या तब्बल ८१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे घरभाडे गोठविण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. याशिवाय यापूर्वी घरभाडे भत्ता गोठवूनही मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ३५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्यावर कार्यवाही का करण्यात येऊ नये या आशयाची कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.
मागील काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे विदर्भातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या असून अनेक वीज कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास नसल्याने वीज यंत्रणेत होणारा बिघाड दुरुस्त करण्यात विलंब होत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत होत्या, या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता प्रादेशिक संचालकांनी मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता गोठविण्याच्या स्पष्ट सूचना केल्या होत्या. तसेच त्यासंदर्भातील अहवाल तीन दिवसात प्रादेशिक कार्यालयाकडे सादर करण्याबाबतही सांगितले होते. याअनुषंगाने महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या वर्धा मंडळातील सर्वाधिक १४ तर त्याखालोखाल नागपूर ग्रामीण, बुलढाणा आणि यवतमाळ मंडळातील प्रत्येकी १०, अकोला मंडळातील ९, अमरावती मंडळातील ८, वाशिम मंडलातील ७, गडचिरोलीतील ५ तर नागपूर शहर मंडळातील ४, भंडारातील ३ तर चंद्रपूर मंडळातील १ अशा एकूण ८१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता जून महिन्याच्या मासिक वेतनापासून गोठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
याशिवाय यापूर्वी घरभाडे भत्ता गोठवूनही मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ३५ जणांना कारणे दाखवा नोटिस बजाविण्यात आली आहे. यात नागपूर ग्रामीण मंडळातील १८, वर्धा मंडळातील १२, नागपूर शहर मंडळातील ४ तर यवतमाळ मंडळातील एका कर्मचाऱ्याचा सहभाग आहे.