ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी नंबर १
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:08 IST2021-01-19T04:08:47+5:302021-01-19T04:08:47+5:30
- १२७ ग्रा.पं.चे निकाल जाहीर, सत्ता स्थापनेसाठी राजकीय गटांची दावेदारी - नागपूर ग्रामीण, कुही आणि कामठी तालुक्यात भाजपची सरशी ...

ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी नंबर १
- १२७ ग्रा.पं.चे निकाल जाहीर, सत्ता स्थापनेसाठी
राजकीय गटांची दावेदारी
- नागपूर ग्रामीण, कुही आणि कामठी तालुक्यात भाजपची सरशी
- आजी-माजी मंत्र्यांनी गाव राखले, जि.प.च्या विरोधी पक्षनेत्याला धक्का
नागपूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांतील विजयानंतर नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीने भाजपला ग्रा.पं. निवडणुकीतही धक्का दिला आहे. नागपूर जिल्ह्यातील १२७ ग्रा.पं.चे निकाल जाहीर झाले आहेत. यात महाविकास आघाडी समर्थित पॅनलने ८४ हून अधिक ग्रा.पं.मध्ये दमदार यश मिळविले आहे. भाजप समर्थित पॅनलला कामठी, नागपूर ग्रामीण आणि कुही तालुक्यात मोठे यश मिळाले. जिल्ह्यात भाजप समर्थित पॅनलचा ३६ ग्रा.पं.मध्ये सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झाला आहे.
सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी ग्रा.पं. यावेळीही राखण्यात राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना यश आले. येथे १७ पैकी ३ जागा बिनविरोध झाल्या होत्या. १४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित पॅनलला १३, तर भाजप समर्थित पॅनलला एका जागेवर यश मिळाले.
कामठी तालुक्यातील कोराडी ग्रा.पं. राखण्यात भाजपचे महामंत्री, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यश आले. येथे भाजप समर्थित आदर्श ग्राम निर्माण आघाडीचा १७ पैकी १२ जागांवर, तर महाविकास आघाडीचा ५ जागांवर विजय झाला. गतवेळी येथे भाजप समर्थित पॅनलने १७ पैकी १७ जागांवर विजय मिळविला होता. यावेळी कोराडीत काँग्रेसचे जि.प. सदस्य नाना कंभाले यांनी भाजपला काहीसा धक्का दिला आहे.
कामठी तालुक्यात महालगाव ग्रा.पं.च्या निकालात काँग्रेस समर्थित गटाचे ४, भाजप समर्थित गटाचे ३, तर तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. येथे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते अनिल निधान यांना काँग्रेसने धक्का दिला आहे.
काटोल तालुक्यातील ३ ग्रा.पं.पैकी एका ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी (राष्ट्रवादीला)ला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. येथे दोन ग्रा.पं.वर महाविकास आघाडी आणि भाजपने दावा केला आहे. नरखेड तालुक्यातील १७ पैकी १५ ग्रा.पं.वर महाविकास आघाडी (राष्ट्रवादी), तर दोन ग्रा.पं.मध्ये भाजप समर्थित पॅनलला यश मिळाले आहे. सावनेर तालुक्यात १२ पैकी ११ ही ग्रा.पं.वर महाविकास आघाडीला (काँग्रेस) बहुमत मिळाले आहे. जटामखोरा ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध निघाली होती.
कळमेश्वर तालुक्यात ५ पैकी ४ ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी (काँग्रेस)ला यश मिळाले आहे. येथे सोनपूर (आदासा) ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध झाली. रामटेक तालुक्यात ९ पैकी ८ ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडीला (काँग्रेस, शिवसेना) यश मिळाले आहे. येथे एका ग्रा.पं.मध्ये भाजप समर्थित पॅनलला बहुमत मिळाले आहे. पाराशिवनी तालुक्यात १० पैकी १० ग्रा.पं.वर महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. मौदा तालुक्यातील ७ पैकी ४ ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी, तर ३ ग्रा.पं.मध्ये भाजप समर्थित गटाला बहुमत मिळाले आहे.
कामठी तालुक्यात ०९ पैकी ६ ग्रा.पं.मध्ये भाजप समर्थित गटाला, तर दोन ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी समर्थित गटाला यश मिळाले आहे. येथे एका ग्रा.पं.मध्ये कुणालाही बहुमत मिळाले नाही. उमरेड तालुक्यात १४ पैकी १० ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी (काँग्रेस), तर ४ ग्रा.पं.मध्ये भाजप समर्थित गटाला यश मिळाले आहे.
भिवापूर तालुक्यात ३ पैकी दोन ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी (काँग्रेस) समर्थित गटाला बहुमत मिळाले, तर मोखाबर्डी ग्रा.पं.मध्ये भाजप समर्थित गट नंबर १ वर राहिला आहे. कुही तालुक्यात २४ पैकी १४ ग्रा.पं.मध्ये भाजप समर्थित गट, तर १० ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडीला (काँग्रेस) बहुमत मिळाले. नागपूर ग्रामीण तालुक्यात ११ पैकी ५ ग्रा.पं.मध्ये भाजप समर्थित गट, महाविकास आघाडी (४), वंचित बहुजन आघाडी (१), तर एका ग्रा.पं.मध्ये अपक्षांनी बाजी मारली. हिंगणा तालुक्यात ५ पैकी ३ ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी, तर एका ग्रा.पं.मध्ये भाजप समर्थित गटाला यश मिळाले. येथे एका ग्रा.पं.मध्ये कुणालाही बहुमत नाही.