महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे टिकेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 19:48 IST2021-08-28T19:48:27+5:302021-08-28T19:48:56+5:30
Nagpur News मी माझ्या आयुष्यात सत्तेचा इतका दुरुपयोग आजवर कधीच बघितलेला नाही, अशा शब्दात केंद्र सरकारवर टीका करीत महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे टिकेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे टिकेल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विरोधकांनी छोट्या-छोट्या गोष्टींना विरोध केला की लाव ईडी, असे प्रकार सुरू आहेत. मी माझ्या आयुष्यात सत्तेचा इतका दुरुपयोग आजवर कधीच बघितलेला नाही, अशा शब्दात केंद्र सरकारवर टीका करीत महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे टिकेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. (The Mahavikas Aghadi government will last for 25 years, Supriya Sule)
शनिवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता आढावा बैठकीसाठी नागपुरात आल्या असता सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, ईडीतील अधिकारी कोण हेसुद्धा आम्हाला कधी माहिती नव्हते. परंतु आता तर एक अधिकारी आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करतो, असे प्रकार ईडीमध्ये सुरू आहेत.
खासगीकरणाला माझा विरोध नाही, पण केंद्र सरकारच्या ज्या पद्धतीने सरकारी कंपन्या विकण्याचा सपाटा लावला आहे ते योग्य नाही, केंद्र सरकारच्या या धोरणाविरोधात आम्ही व सर्वच विरोधी पक्ष मागील चार-पाच वर्षांपासून बोलत आहोत. कोरोनाच्या या संकटाच्या काळात फायद्यात असलेल्या कंपन्याही ज्या पद्धतीने विकल्या जात आहेत, ते योग्य नाही. घरातील संपत्ती विकण्याची वेळ तेव्हाच येते जेव्हा दिवाळे निघाले असेल, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. मी इनस्ट्ंट कॅाफीसारखं जीवन जगत नाही. त्यामुळे फडणवीस-मुख्यमंत्री ठाकरे भेटीवर मी काही बोलणार नाही. राजकीय नेते एकदुसऱ्याला भेटत असतील तर त्यात काही गैर नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नाबाबत सर्व पक्षांचेच एकमत झाले होते, यावर शुक्रवारी पुन्हा बैठक बोलावली असून, त्यात सर्व मिळून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. पत्रपरिषदेला माजी मंत्री रमेश बंग, शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी आमदार प्रकाश गजभिये, शब्बीर विद्रोही उपस्थित होते.
केंद्राने पुरवठा केल्यास दोन महिन्यात शंभर टक्के लसीकरण
- देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झाले आहे. केंद्र सरकारकडून मागणीनुसार लस पुरवठा झाला तर दोन महिन्यांत राज्यात शंभर टक्के लसीकरण होण्यात कोणतीही अचडण नाही, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.