वसीम कुरैशी लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील पहिली इन्स्टिट्यूट ऑफ डिजॉस्टर मॅनेजमेंट नागपूरच्या मिहान परिसरात तयार होणार असून, ती महामेट्रोकडून तयार केली जाणार आहे. या संबंधाचा सरकारी आदेश जारी झाला आहे.
या संस्थेसाठी मिहानच्या नॉन एसईझेडमध्ये १० एकरांत जमीन घेण्यात आली आहे. राज्य सरकारने या जमिनीच्या बदल्यात १३.६९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मिहानमध्ये जमिनीचे सीमांकन झाल्यानंतर स्टेट डिझॉस्टर मॅनेजमेंटला सोपविली जाणार आहे. तसा करार पुढच्या आठवड्यात होऊ शकतो.
उल्लेखनीय म्हणजे, आपत्ती, बचाव आणि फायर फायटिंगशी संबंधित विश्वस्तरीय केंद्रीय संस्था नागपुरात आहे. त्यात देशातील एकमात्र फायर इंजिनिअरिंग कॉलेज, तसेच नॅशनल डिजॉस्टर रिस्पॉन्स फोर्स अकादमीदेखील नागपुरातच आहे. आता राज्यातील पहिले आपत्ती व्यवस्थापन संस्थानसुद्धा नागपुरात होत आहे.
महामेट्रोच्या सूत्रांनुसार, संस्थेच्या इमारतीसाठी ड्रॉइंग तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. मिहानच्या नॉन एसईझेड सेक्टर १२ ए च्या प्लॉट नंबर ६ मध्ये संस्थेची भव्य आणि आकर्षक इमारत उभारली जाणार आहे.
ठळक मुद्दे
- मिहानच्या स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ डिझॉस्टर मॅनेजमेंटसाठी २०२२ मध्ये प्रस्ताव देण्यात आला होता.
- येथे प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी निवासाचीही व्यवस्था राहणार आहे.
- या संस्थेत राज्यातील विविध भागांतून डिझॉस्टर मॅनेजमेंटचे अधिकारी नागपुरात पोहोचणार असून, येथे त्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग, मास्टर ट्रेनिंगसह अन्य ट्रेनिंगदेखील दिले जाणार आहे.
- या संस्थेला वर्धा रोड, आउटर रिंग रोड आणि समृद्धी महामार्गाचीदेखील चांगली कनेक्टिव्हिटी आहे, तसेच ही संस्था विमानतळापासूनही जवळच आहे.