Maharashtra Gram Panchayat Election Results; नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीची आगेकूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 13:01 IST2021-01-18T13:00:40+5:302021-01-18T13:01:49+5:30
Maharashtra Gram Panchayat Election Results नागपूर जिल्ह्यातील १२७ ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी समर्थित पॅनेलला आतापर्यंत ५० हून ग्रा.पं.मध्ये यश मिळाले आहे.

Maharashtra Gram Panchayat Election Results; नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीची आगेकूच
जितेंद्र ढवळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील १२७ ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी समर्थित पॅनेलला आतापर्यंत ५० हून ग्रा.पं.मध्ये यश मिळाले आहे. कामठी तालुक्यातील कोराडी ग्रा.पं.राखण्यात भाजपाचे महामंत्री माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यश आले आहे. येथे भाजपा समर्थित आर्दश ग्राम निर्माण पॅनेलचा १७ पैकी १२ जागावर तर महाविकास आघाडीचा ५ जागांवर विजय झाला आहे. गतवेळी येथे भाजप समर्थित पॅनेलचा १७ पैकी १७ जागावर विजय मिळविला होता. यावेळी कोराडीत काँग्रेसचे जि.प.सदस्य नाना कंभाले यांनी भाजपला काहीसा धक्का दिला आहे.
सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी ग्रा.पं. राखण्यात राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना यश आले आहे. येथे १७ पैकी ३ जागा बिनविरोध झाल्या होत्या. १४ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत काँग्रेस समर्थित पॅनेलला १३ तर भाजप समर्थित पॅनेलचा एका जागेवर यश मिळाले आहे.
कामठी तालुक्यात महालगाव ग्रा.प.च्या निकालात काँग्रेस समर्थित गटाचे ४, भाजप समर्थीत गटाचे ३ तर तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहे. येथे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांना काँग्रेसने मोठा धक्का दिला आहे.
कळमेश्वर तालुक्यात ५ पैकी ४ जागावर काँग्रेस समर्थित पॅनेलचा विजय झाला आहे. येथे सोनपूर (आदासा) ग्रा.पं.निवडणूक बिनविरोध झाली होती. येथे सोनेगाव ग्रा.पं.मध्ये काँग्रेस-७, भाजपा-२, कोहळी ग्रा.पं.मध्ये काँग्रेस-७, भाजपा-२ आणि दोन अपक्ष उमेदवारांचा विजय झाला आहे. सेलू ग्रा.पं.मध्ये काँग्रेस-५ तर भाजपा-४ आणि सावंगी ग्रा.प.मध्ये काँग्रेसच्या तिन्ही गटाला यश मिळाले आहे.
रामटेक तालुक्यात ९ पैकी ७ ग्रा.पं.वर महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. नरखेड तालुक्यातील १७ ग्रा.पं.च्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस (महाविकास आघाडीने) मुंसडी मारली आहे. येथे माणिकवाडा ग्रा.पं.मध्ये राष्ट्रवादी समर्थित पॅनेलने ९ पैकी ६ जागावर विजय झाला आहे. येथे मदना ग्रा.पं.त शिवसेना समर्थित पॅनेलला यश मिळाले आहे. येथे ग्रामविकास आघाडीला ६ तर ग्राम परिवर्तन पॅनेलला एका जागेवर यश मिळाले आहे. जामगाव (खुर्द) ग्रा.पं.वर भाजपाने राष्ट्रवादी समर्थित पॅनेलवर ८-१ विजय मिळविला आहे.