महामेट्रो दरवर्षी करणार १२ कोटींची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 09:57 PM2018-06-05T21:57:21+5:302018-06-05T21:57:43+5:30

महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व मेट्रो स्थानकांवर सौर ऊर्जेचा वापर होणार असून या माध्यमातून महामेट्रो दरवर्षी १४ मेगावॅट विजेची निर्मिती करून तब्बल १२ कोटी रुपये वाचविणार आहे. पुढील काळात सर्व ४० स्टेशनवर सोलर पॅनल बसविण्यात येणार आहे.

Mahametro will save 12 crores every year | महामेट्रो दरवर्षी करणार १२ कोटींची बचत

महामेट्रो दरवर्षी करणार १२ कोटींची बचत

Next
ठळक मुद्देसर्व मेट्रो स्थानकांवर सौर ऊर्जा प्रकल्प : दरवर्षी १४ मेगावॅट वीज निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व मेट्रो स्थानकांवर सौर ऊर्जेचा वापर होणार असून या माध्यमातून महामेट्रो दरवर्षी १४ मेगावॅट विजेची निर्मिती करून तब्बल १२ कोटी रुपये वाचविणार आहे. पुढील काळात सर्व ४० स्टेशनवर सोलर पॅनल बसविण्यात येणार आहे.
साऊथ एअरपोर्ट स्टेशनवर पहिले पॅनल
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सोमवारी साऊथ एअरपोर्ट स्टेशन येथून सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात महामेट्रोच्या साऊथ एअरपोर्ट, न्यू एअरपोर्ट आणि खापरी मेट्रो स्थानकांवर नंतर सर्व स्टेशन्सवर आणि इतर कार्यालयांवर सोलर पॅनल बसविणार येणार आहे. साऊथ एअरपोर्ट स्टेशनवर सौर ऊर्जेचे पहिले पॅनल बसविण्यात आले. उद्घाटन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या हस्ते झाले. सौर ऊर्जेचे पहिले पॅनल बसविण्यासोबतच महामेट्रोच्या तीन स्टेशनची इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलतर्फे प्लॅटिनम रेटिंग सर्टिफिकेटकरिता निवड करण्यात आली. या निमित्ताने आयजीबीसीतर्फे प्रशस्तीपत्र व मानचिन्ह आयजीबीसी विदर्भ चॅप्टरचे प्रमुख अशोक मोखा यांनी डॉ. बृजेश दीक्षित यांना प्रदान केले.
तिन्ही स्टेशनवर ९६२ सोलर पॅनल
या तिन्ही स्टेशनवर एकूण ९६२ सोलर पॅनल बसविण्यात येणार असून हे काम एका महिन्यात पूर्ण होणार आहे. पारंपरिक पद्धतीने मिळणाऱ्या विजेची किमत प्रति युनिट ९.६७ रुपये आहे. या उलट सौर ऊर्जेचा वापर केल्यास प्रति युनिट ३.५८ रुपये दराने वीज महामेट्रोला मिळणार आहे. या हिशोबानुसार सौर ऊर्जेचा वापर केल्यास महामेट्रोची प्रति युनिट ६.०९ रुपये बचत होणार आहे. पर्यावरण संरक्षणाचे ध्येय असलेल्या महामेट्रोने सौर ऊर्जेच्या वापरावर निर्माण कार्यापासूनच भर देण्यात आल्याचे दीक्षित यांनी यावेळी सांगितले.
६ हजार झाडे लावणार
महामेट्रोच्या इतर सर्व स्टेशनकरितादेखील प्लॅटिनम सर्टिफिकेट मिळवण्याची तयारी सुरू केली आहे. पर्यावरणपूरक व्यवस्था स्टेशनवर केल्याने हे मानांकन मिळाले आहे. या अंतर्गत येणाऱ्या विविध श्रेणीमध्ये एकूण ७९ गुण महामेट्रोला मिळाले आहे. महामेट्रोतर्फे हिंगणा येथील वासुदेवनगर भागात लिटिल वूडची स्थापना २ वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. येत्या काळात त्या भागातील १०० एकर जमीन मिळविण्याचा प्रयत्न असून सुमारे ६००० झाडे लावण्याचा मानस आहे. मेट्रो प्रकल्पाला सुरवात झाल्यापासून आजवर नागपुरात ६४ टक्के काम पूर्ण झाले आहे.
प्रकल्प संचालक महेश कुमार यांनी इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलतर्फे मिळालेल्या मानांकनाची माहिती दिली तर रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथूर यांनी सौर ऊर्जा प्रकल्पाबद्दल सांगितले. महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे यांनी सूत्र संचालन आणि आभार मानले.

सौर ऊर्जा प्रकल्पाची वैशिष्ट्ये :

  •  साऊथ एअरपोर्ट स्टेशनवर ६८ किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल, दरवर्षी सुमारे १ लाख युनिट वीज निर्मिती आणि ६ लाख रुपयांची बचत.
  •  न्यू एअरपोर्ट स्टेशनवर ११२ किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल, दरवर्षी सुमारे १.६० लाख युनिट वीज निर्मिती आणि १० लाख रुपयांची बचत.
  •  खापरी स्टेशनवर १३२ किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल, दरवर्षी सुमारे १.९० लाख युनिट वीज निर्मिती आणि १२ लाख रुपयांची बचत.
  • एअरपोर्ट साऊथ स्टेशन, न्यू एअरपोर्ट स्टेशन आणि खापरी मेट्रो स्टेशन येथे एकत्रितपणे ३१२ किलोवॅट क्षमतेचे वीजनिर्मिती आणि दरवर्षी एकूण २८ लाख रुपयांची बचत.
  •  सोलर पॅनल बसविण्याचे काम ‘फोर्थ पार्टनर एनर्जी’ या कंपनीकडे. कंपनीकडून ३ रुपये ५८ पैसे प्रतियुनिट दराने महामेट्रो वीज खरेदी करणार. या प्रकल्पांतर्गत बसविल्या जाणाऱ्या प्रत्येक सोलर पॅनलचे वजन २२ किलो.
  •  प्रकल्पात फक्त ‘मेक इन इंडिया’ सोलर पॅनेलचा वापर. केंद्र सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या योजनेंतर्गत हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

Web Title: Mahametro will save 12 crores every year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.