महाआघाडीला विधानसभेत जमले, ग्रामपंचायतीत का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:18 IST2021-01-13T04:18:32+5:302021-01-13T04:18:32+5:30
जितेंद्र ढवळे नागपूर : जिल्ह्यातील १३० ग्रामपंचायतींची निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आली आहे. गावागावांत राजकीय फड रंगले आहेत. ग्रामपंचायतींची ...

महाआघाडीला विधानसभेत जमले, ग्रामपंचायतीत का नाही?
जितेंद्र ढवळे
नागपूर : जिल्ह्यातील १३० ग्रामपंचायतींची निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आली आहे. गावागावांत राजकीय फड रंगले आहेत. ग्रामपंचायतींची निवडणूक एकसंघ होऊन लढण्याचा संकल्प महाविकास आघाडीच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी केला होता. मात्र नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी या तिन्ही पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात दंड थोपटल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीतील या बिघाडीचे दाखले देत भाजप मैदानात उतरली आहे. मात्र ग्रा.पं. आणि सरपंच पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद भाजपला कळेल, असा दावा या तिन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे.
जिल्ह्यातील १३० पैकी कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर(अदासा) आणि सावनेर तालुक्यातील जटामखोरा ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला निवडणूक होत आहे. त्यात १,१८१ जागांसाठी २,७९८ उमेदवार रिंगणात आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघातील विजयानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या ग्रा.पं. निवडणुकीच्या संदर्भाने आशा बळावल्या आहेत. ग्रा. पं. निवडणुकीच्या प्रचारात तिन्ही पक्षांचे जिल्हा आणि राज्य पातळीवरील नेते विजयासाठी पदवीधर मतदारसंघातील एकसंघतेचा मंत्र कार्यकर्त्यांना देत मतदारांना साद घालत आहेत. मात्र काही तालुक्यांत या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गावगाड्यातील वर्चस्वासाठी एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. ग्रा. पं. निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकसंघतेचा मंत्र कार्यकर्त्यांना दिला असला तरी तो अद्याप सर्वच ठिकाणी पचणी पडलेला नाही.
ग्रा. पं. निवडणुका जाहीर झाल्यानंतर या तिन्ही पक्षांचे नेते जागावाटपासंदर्भात एकत्र बसले नाहीत, हे वास्तव आहे. तिन्ही पक्षांनी स्वतंत्र बैठका घेत कार्यकर्त्यांना भाजपला टक्कर देण्याचे आवाहन केले. ‘गावात एकच गट’ असा काँग्रेसने विजय मंत्र दिला आहे. मात्र काही गावांत तो फसला आहे. जिल्ह्यात सावनेर, कळमेश्वर, कामठी, काटोल आणि मौदा तालुक्यात हे तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत हे वास्तव आहे. त्यामुळे मतदार स्थानिक मुद्दे घेऊन गावाच्या निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांना कौल देतात की एकसंघतेचा संकल्प करणाऱ्या महाविकास आघाडीला हे १८ जानेवारीलाच स्पष्ट होईल.
निकालानंतर चित्र बदलेल
गावातील राजकीय वर्चस्वासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते काही ठिकाणी एकमेकांविरोधात लढत आहेत. मात्र सरपंचपदाच्या निवडणुकीत तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येत भाजपला शह देतील, असा विश्वास आघाडीतील जिल्हा पातळीवरील नेत्यांनी व्यक्त केला आहे.
निकालानंतर खराखुरा चेहरा समोर आला
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. मात्र ग्रा.पं.च्या निवडणुकीत तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते गावातील राजकीय वर्चस्वासाठी मैदानात उतरले आहेत. नेते एकसंघतेचा मंत्र देत असले तरी गावात आपल्या पक्षाचे संघटन कायम राहावे म्हणून कुणीही कसर सोडताना दिसत नाही. त्यामुळे ग्रा.पं. निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचा खराखुरा चेहरा समोर आला, असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.
---
महाविकास आघाडीचे राज्यात सरकार आहे. मात्र स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षांत कुठेही ताळमेळ दिसत नाही. ग्रा. पं. निवडणुकीत काही ठिकाणी तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत. भाजपचे ग्रामीण भागात मजबूत संघटन आहे. कार्यकर्ता पक्षाशी एकनिष्ठ आहे. ग्रा. पं. निवडणुकीत भाजपला याचा फायदा होईल. भाजपची जिल्ह्यात बहुतांश गावांत सत्ता स्थापन होईल.
- अरविंद गजभिये
जिल्हाध्यक्ष, भाजप
-----------
महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात यशस्वी ठरला आहे. अलीकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीला मोठा विजय मिळाला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातील विजय याचे आदर्श उदाहरण आहे. एकसंघतेचा हाच संकल्प घेत महाविकास आघाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही लढवित आहे. यामुळे मतांचे विभाजन होणार नाही. महाविकास आघाडीला गावागावांत मोठे यश मिळेल.
- राजेंद्र मुळक, अध्यक्ष, नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)
-----
महाविकास आघाडी ग्रामपंचायत निवडणुकीत विखुरलेली नाही. सरपंच पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद सर्वांनाच दिसेल. जिल्ह्यात निवडणूक होऊ घातलेल्या ५० टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये तिन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत सामंजस्याने जागावाटप केले आहे. काही ठिकाणी तिन्ही पक्ष वेगवेगळे लढत आहेत, हे वास्तव आहे. मात्र सरपंच पदाच्या निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्र येतील, यात दुमत नाही.
- बाबा गुजर
जिल्ह्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
---
ग्रामपंचायतीच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात. प्रत्येक पक्षाला येथे कार्यकर्ता सक्षम व्हावा असे वाटते. कारण ही निवडणूक पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा पाया असते. नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते वेगवेगळे लढत आहेत, हे वास्तव आहे. मात्र निवडणूक होऊ घातलेल्या १३० पैकी ८० टक्के ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडी एकसंघ लढत आहे. रामटेक, कामठी, उमरेड आणि हिंगणा तालुक्यात तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत भाजपपुढे आव्हान उभे केले आहे.
- संदीप इटकेलवार
जिल्हा प्रमुख, शिवसेना (नागपूर ग्रामीण)