लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिहारमधील महाबोधी महाविहार या जगप्रसिद्ध बौद्ध धार्मिक स्थळाचे व्यवस्थापन बौद्ध भिक्खू संघ आणि बौद्ध समाजाच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक आणि धर्मनिरपेक्ष पद्धतीने व्हावे, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बौद्ध समाजाच्यावतीने मुंबई येथे बुधवारी अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.
महाबोधी महाविहार हे केवळ एक विहार नाही, तर बौद्ध धर्मीयांचे जागतिक श्रद्धास्थान असून युनिस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेले ऐतिहासिक स्थळ आहे. तथापि, आजही या पवित्र स्थळाच्या व्यवस्थापनात बौद्ध समाजाची आणि भिक्खू संघाची सहभागिता अत्यंत मर्यादित आहे. हा केवळ धार्मिक नाही, तर बौद्ध समाजाच्या आत्मसन्मानाचा आणि सांस्कृतिक अस्तित्वाचा प्रश्न आहे. म्हणूनच बौद्ध समाजाच्या भावना लक्षात घेऊन, या स्थळाचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या हाती देण्याचा निर्णय शासनाने तात्काळ घ्यावा, ही संपूर्ण बौद्ध धर्मियांची ठाम आणि न्याय्य मागणी आहे असे यावेळी शिष्टमंडळाने सांगितले. बौद्ध धर्माच्या मूलभूत तत्त्वांनुसार - शांती, करुणा आणि समता यांचा प्रसार करणाऱ्या या स्थळाचे व्यवस्थापनदेखील तितक्याच आदर्श मूल्यांच्या आधारे व्हावे, असे समाजाचे मत आहे.
यावेळी माजी मंत्री आ. डॉ नितीन राऊत यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात अखिल भारतीय भिक्षु संघाचे प्रतिनिधी भदंत विनय रख्खितो, भदंत ज्ञानबोधि महाथेरो, भिक्षुणी धम्मदिन्ना इतर भिक्षुसंघ, अशोक गोडघाटे, बंडोपंत टेंभुर्णे, अनिल नगरारे, सुरेश पाटील, अशोक कोल्हटकर, अमन कांबळे, भीमराव वैद्य, एन. टी. मेश्राम, राजेश लाडे, उमेश बोरकर, तक्षशिला वाघधरे व इतर बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.