बेड निर्माण केले; व्यवस्थेचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:08 IST2021-04-20T04:08:01+5:302021-04-20T04:08:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागपूर शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले ...

बेड निर्माण केले; व्यवस्थेचे काय?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागपूर शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले आहे. उपचाराची गरज असूनही नाईलाजाने अनेकजण गृहविलगीकरणात आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेत आहेत. परंतु अत्यवस्थ रुग्णांना विविध रुग्णालयांत उपचारासाठी ऑक्सिजन व जीवनरक्षणप्रणाली (व्हेंटिलेटर) लावले जाते. गृहविलगीकरणातील रुग्णांकडे ही सुविधा नाही. यामुळे विलगीकरणात दगावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दीड महिन्यात ४५ रुग्णांचा मृत्यू झाला. महापालिकेसह विविध संस्थांकडून बेडची सुविधा निर्माण केली जात आहे. परंतु उपचारासाठी आवश्यक असलेले डॉक्टर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेचीच यंत्रणा ढासळली आहे. पुरेशा डॉक्टरांची आणि बेडची व्यवस्था करण्यात मनपा सपशेल अपयशी ठरली आहे. मुंबई आणि पुणे, नवी मुंबई महापालिकेने कोरोना रुग्णालयाची आणि कोविड केअर सेंटरची संख्या वेगाने वाढवली. नागपुरात मात्र नवीन रुग्णालय, कोविड केअर सेंटरची संख्या तर वाढली नाहीच, पण जे रुग्णालय आणि केंद्र आहेत त्यात पुरेसे मनुष्यबळही उपलब्ध करण्यात आलेले नाही.
मनपाची प्राथमिक आरोग्य सेवेची जबाबदारी असल्याची भूमिका घेत आजवर ही जबाबदारी मेयो आणि मेडिकलवर ढकलण्याचा प्रयत्न झाला आहे. मनपाचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कळमेश्वर मार्गावर येथे ५००० खाटांचे कोविड केअर सेंटर तयार करण्याची घोषणा केली होती. येथे बेड, शौचालय, पंखे व अन्य सुविधांवर महापालिकेने ४५ ते ५० लाखांचा खर्चदेखील केला होता. पण, आज त्याची गरज असताना महापालिका प्रशासनाचे त्याकडे लक्ष नाही.
नागरिकांच्या रोषामुळे ऑक्सिजन बेड
कोरोच्या पहिल्या लाटेत मनपाच्या पाच रुग्णालयावर ७ ते ८ कोटी खर्च करण्यात आली. यातून बांधकाम, दुरुस्ती व यंत्रसामुग्रीवर हा खर्च झाला. इंदिरा गांधी रुग्णालय, आयसोलेशन, आयुष, पाचपावली सुतिकागृह व केटीनगर रुग्णालयाचा यात समावेश होता. या रुग्णालयात ४२२ ऑक्सिजन बेड निर्माण केले जाणार आहेत. कोरोना लाटेतून धडा घेऊन युद्धपातळीवर हे काम करणे अपेक्षित होते. परंतु १५४ ऑक्सिजन बेड निर्माण करू शकले. आता पाचपावली रुग्णालयात ११० बेड निर्माण केले आहे. काही दिवसांत केटीनगर येथील ११० बेड तयार होतील. उपचार मिळत नसल्याने नागरिकांत निर्माण झालेला रोष लक्षात घता मनपा प्रशासन व पदाधिकाऱ्यांना ऑक्सिजन बेड गरज भासली आहे.
.....
वेळेवर अनुभवी डॉक्टर कसे मिळणार
महापालिकेने डॉक्टर नियुक्तीसाठी जाहिरात दिली. दोन ते अडीच लाख रुपये वेतन देऊ केले. पण त्यासाठी अर्ज आले नाहीत. महापालिका आयुक्तांना महासाथीमध्ये प्राप्त अधिकाराचा वापर करून डॉक्टरांची नियुक्ती करता येते. परंतु देशभरात सवींकडेच सारखीच परिस्थिती असल्याने डॉक्टर मिळणे अवघड झाले आहे. यासाठी सहा महिन्यांपूर्वीच प्रयत्न करण्याची गरज होती. परंतु पदाधिकाऱ्यांनाही याचा विसर पडला.