गीतकार हा मानवी जीवनाचाही भाष्यकार असतो
By Admin | Updated: June 26, 2014 00:53 IST2014-06-26T00:53:43+5:302014-06-26T00:53:43+5:30
कुठलीही चळवळ समोर जात असते, अडखळत असते, त्यात उणिवाही निर्माण होतात. पण चळवळ चालविणाऱ्यांना अनेकदा त्याचे भान राहात नाही. कवी आणि गीतकारांना मात्र चळवळ

गीतकार हा मानवी जीवनाचाही भाष्यकार असतो
यशवंत मनोहर :कवी बी. काशीनंद यांना आदरांजली
नागपूर : कुठलीही चळवळ समोर जात असते, अडखळत असते, त्यात उणिवाही निर्माण होतात. पण चळवळ चालविणाऱ्यांना अनेकदा त्याचे भान राहात नाही. कवी आणि गीतकारांना मात्र चळवळ योग्य पद्धतीने चालावी यासाठी प्रेरणा द्यावी लागते. योग्य पद्धतीने चळवळ चालावी म्हणून कारणे द्यावी लागतात. गीतकार हा विचारांचा समीक्षकच असतो. तो मानवी जीवनांचा भाष्यकारही असतो, असे मत सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत कवी डॉ. यशवंत मनोहर यांनी बुधवारी व्यक्त केले.
निळाई सामाजिक सांस्कृतिक परिवाराच्यावतीने स्मृतिशेष गीतकार, कवी बी. काशीनंद यांना श्रद्धांजली देण्यासाठी आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला कवी इ.मो. नारनवरे, सतेश्वर मोरे, अशोक बुरबुरे, संजय शेजव, राहुल दहिकर, प्रवीण कांबळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. हा कार्यक्रम विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात पार पडला. डॉ. मनोहर म्हणाले, गीतकाराला चळवळीसाठी गीते लिहिताना संपूर्ण सामाजिक स्थितीचा विचार करावा लागतो. तो समाजाला मार्गदर्शन आणि दिशाही देत असतो. त्यामुळेच गीतकार अतिशय महत्त्वाचा घटक आहे. यात बी. काशीनंद यांनी केलेल्या कार्याला तोड नाही. बी. काशीनंद यांनी गीतांच्या माध्यमातून विचार दिला, प्रेरणा दिली आणि लोकशिक्षणही केले. त्यांचे योगदान आपण कधीही विसरू शकत नाही.
संजय शेजव म्हणाले, बी. काशीनंद यांची गीते महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्ध आहेत. वामनदादा कर्डक यांच्यानंतर त्यांच्या गीतांनीच आम्हाला प्रेरणा दिली आहे. त्यांच्या निधनाने विचार देणारा मार्गदर्शक हरपला. राहुल दहिकर म्हणाले, माझा त्यांचा परिचय नव्हता; पण गीतकार, कवी आणि छायाचित्रकार म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या गीतांनी समाजमन ढवळून निघाले. आपणही समाजासाठी काम करीत राहणे, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. इ.मो. नारनवरे म्हणाले, समाज कसा घडावा आणि तो कुठल्या दिशेने गेला पाहिजे, याचे मार्गदर्शन बी. काशीनंद यांच्या गीतांनी केले. समाज घडण्यामागे अशा अनेक कवींचा सहभाग आहे. आंबेडकरांचा विचार पोहोचविणाऱ्या या कवींची मात्र उपेक्षाच झाली. कवितेतून समाजात ऊर्जा पेरणाऱ्या या कवीला माझा सलाम आहे. अशोक बुरबुरे म्हणाले, बी. काशीनंद यांचे नाव लहानपणापासून ऐकले आहे. त्यांच्या गीतांनीच आमच्या पिढीवर संस्कार झाले.
त्यांच्या गीतांनी एक काळ गाजला. हल्ली मात्र मुक्तछंदातच सारे लिहित आहेत. मुक्तछंद हा कवितेला लागलेला शाप आहे. यामुळे लोककलावंतांना नाकारले जात आहे. ज्यांनी मार्ग आणि विचार दिला त्यांना आम्ही सन्मान देऊ शकत नाही का, हा विचार करण्याची वेळ आता आली आहे. बी. काशीनंद यांचा वारसा सांगताना आम्हाला अभिमान वाटतो, असे ते म्हणाले. सतेश्वर मोरे म्हणाले, आंबेडकरी मूल्य समाजात झिरपवण्याचे काम बी. काशीनंद यांनी केले. आता लोककलावंत खेड्यातून शहरात येतात आणि शहरात त्यांची कविता फुलत नाही कारण त्यांच्या गीताला प्रेरणा देणारी स्थिती येथे नसते. त्यामुळे तळागाळातल्या माणसाच्या प्रबोधनाची चिंता वाटते. पूर्वी लोकगीतांचे कार्यक्रम रात्रभर चालायचे. आता रात्री १० वाजताची मर्यादा आल्याने ही चळवळ खुंटते आहे. ही परंपरा सुरू राहावी, आणि समाजाचे प्रबोधन व्हावे म्हणून काम करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी बी काशीनंद यांचा मुलगा सुनील बागडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात विविध आंबेडकरी आणि सामाजिक संघटनांनी बी. काशीनंद यांना आदरांजली अर्पण केली. (प्रतिनिधी)