दोन वर्षांअगोदर प्रेमविवाह; जावयाचा आता काटा काढण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2023 21:30 IST2023-05-16T21:30:32+5:302023-05-16T21:30:58+5:30
Nagpur News दोन वर्षांअगोदर मर्जीविरोधात प्रेमविवाह करणाऱ्या जावयाचा सासऱ्याने आता जीव घेण्याचा प्रयत्न केला. सहकाऱ्यांच्या मदतीने त्याने जावयावर चाकूने वार केले. यात जावयासह त्याचा मामेभाऊही गंभीर जखमी झाला आहे.

दोन वर्षांअगोदर प्रेमविवाह; जावयाचा आता काटा काढण्याचा प्रयत्न
नागपूर : दोन वर्षांअगोदर मर्जीविरोधात प्रेमविवाह करणाऱ्या जावयाचा सासऱ्याने आता जीव घेण्याचा प्रयत्न केला. सहकाऱ्यांच्या मदतीने त्याने जावयावर चाकूने वार केले. यात जावयासह त्याचा मामेभाऊही गंभीर जखमी झाला आहे. यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.
मोहम्मद सलालुद्दिन कामिल उर्फ मोहम्मद परवेज कुरैशी (२७, गुलशननगर, कळमना) असे जखमी जावयाचे नाव आहे. त्याने दोन वर्षांअगोदर आलम अली उर्फ हसन अन्सारी (४४, वनदेवीनगर) याच्या मुलीशी प्रेमविवाह केला होता. याला आलमचा विरोध होता. मात्र, त्याचे न ऐकता हा विवाह झाला होता. तेव्हापासून त्याच्या मनात जावयाविरोधात राग होता.
सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास कामिल हा त्याचा मामेभाऊ फैजल शफी कुरैशी (३०, वांजरा) याच्यासोबत वनदेवीनगर चौक येथून जात होता. त्यावेळी आलम त्याचे साथीदार सिकंदर अली उर्फ हसन अन्सारी (२१, वनदेवीनगर), सुलतान अन्सारी (वनदेवीनगर) व एका अल्पवयीन मुलासह होता. त्यांनी दोन्ही भावांना थांबविले व शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर, अचानक कामिलवर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. फैजलने आपल्या भावाला वाचवायचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्यावरही चाकूने वार करण्यात आले. घटनास्थळी गोंधळ ऐकून लोक एकत्र झाले व सर्व आरोपी तेथून फरार झाले. दोन्ही भाऊ जखमी अवस्थेत रक्तबंबाळ झाले होते. त्यांना मेयो इस्पितळात नेण्यात आले. कामिलच्या तक्रारीनंतर यशोधरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी सासरा आलम याच्यासह सिकंदर अली उर्फ हसन अन्सारी याला अटक केली आहे. इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.