मुलांवर अटीशिवाय प्रेम करा
By Admin | Updated: January 3, 2015 02:32 IST2015-01-03T02:32:48+5:302015-01-03T02:32:48+5:30
सर्वच पालक आपल्या मुलांवर प्रेम करतात, पण त्यामागे विविध अटी असतात. मुलगा वर्गात पहिला आला, स्पर्धेत पुरस्कार जिंकला, सांगितले तसे ऐकले, इत्यादी परिस्थितीच मुलांवर प्रेम केले जाते.

मुलांवर अटीशिवाय प्रेम करा
नागपूर : सर्वच पालक आपल्या मुलांवर प्रेम करतात, पण त्यामागे विविध अटी असतात. मुलगा वर्गात पहिला आला, स्पर्धेत पुरस्कार जिंकला, सांगितले तसे ऐकले, इत्यादी परिस्थितीच मुलांवर प्रेम केले जाते. अन्यथा कुणीही मुलांना जवळ करीत नाही. ही पद्धत चुकीची असून मुलांवर अटीशिवाय प्रेम करायला शिका, असे आवाहन प्रसिद्ध समुपदेशक राजा आकाश यांनी केले.
डॉ. दंदे फाऊंडेशनतर्फे शुक्रवारी झाशी राणी चौकातील रामगोपाल माहेश्वरी सांस्कृतिक सभागृह येथे ‘मुलांचा अभ्यास व वागणूक विकासामध्ये पालकांची भूमिका’ विषयावर राजा आकाश यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पालकांनी कसे वागले पाहिजे यावर मार्गदर्शन केले. व्यासपीठावर अबॅकस यूसीएमएएस संस्थेचे प्रादेशिक प्रभारी दिलीप जैन व फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे उपस्थित होते.
जुन्या काळात संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे कुणी रागावले तर, कुणीतरी समजावण्यासाठी राहात होते. आज ही परिस्थिती नाही. यामुळे रागावण्याचा प्रकार धोकादायक आहे. सतत चिडल्यामुळे मुले आत्महत्या करू शकतात. आदेश देणे कोणालाच आवडत नाही. मुलांनाही स्वाभिमान असतो. त्यांना राग आल्यास काहीच साध्य होत नाही. यामुळे मुलांना प्रेमाने समजावून सांगा. आदेश न देता प्रश्नाच्या स्वरूपात विचारपूस करा. त्याच्याशी चर्चा करा. संवाद वाढवा. सर्वात चांगले नाते स्पर्शाचे आहे. स्पर्शातून प्रेम व्यक्त केल्यास मुलांमध्ये सकारात्मक भावणा निर्माण होते. पालक आपल्यावर प्रेम करतात. त्यांना दुखवायला नको, असे मुलांना वाटायला लागते, असे आकाश यांनी सांगितले.
२० वर्षांपूर्वीच्या व आताच्या पालकांच्या समस्यांचे स्वरूप बदलले आहे. पूर्वीचे पालक मुलगा अभ्यास करीत नाही, खोडकर आहे, सतत खेळत राहतो अशा तक्रारी करायचे. आजचे पालक मुलांच्या व्हॅट्स अॅप, फेसबूक, संगणकीय खेळ इत्यादीच्या वेडामुळे त्रस्त आहेत. परंतु, यात मुलांचा काहीच दोष नसून यासाठी पालकच सर्वस्वी जबाबदार आहेत. सामाजिक वातावरण व मनोरंजन माध्यमांचा मुलांवर वाईट परिणाम होत आहे. पूर्वी मुलांच्या जीवनात अनेक गोष्टींचा अभाव राहात होता. कोणतीही गोष्ट त्यांना सहजतेने मिळत नव्हती. तीच मुले आज पालक झाल्यानंतर स्वत:च्या मुलाला काहीच कमी पडू द्यायचे नाही अशा पद्धतीने वागतात. ही वागणूक मुलांची दिशा भटकविण्यास कारणीभूत ठरत आहे, असे आकाश यांनी स्पष्ट केले.
डॉ. दंदे यांनी प्रास्ताविक करताना आजच्या स्पर्धेच्या काळात मुले अष्टपैलू व मानसिकदृष्ट्या कणखर असणे आवश्यक असल्याचे सांगितले. दिलीप जैन व नागपूर किड्स शाळेच्या समन्वयक प्रीती सावळे यांनीही समयोचित विचार व्यक्त केले. डॉ. गजानन नारे यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)