समता एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची लूटमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 00:15 IST2020-10-30T00:14:20+5:302020-10-30T00:15:54+5:30
Samata Express Robbery, Crime newsविशाखापट्टणमवरून निजामुद्दीनला जाणाऱ्या समता एक्स्प्रेसमध्ये काही असामाजिक तत्त्वांनी लूटमार करून चार प्रवाशांचे मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास कळमना ते मोमिनपुरा दरम्यान घडली.

समता एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची लूटमार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विशाखापट्टणमवरून निजामुद्दीनला जाणाऱ्या समता एक्स्प्रेसमध्ये काही असामाजिक तत्त्वांनी लूटमार करून चार प्रवाशांचे मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास कळमना ते मोमिनपुरा दरम्यान घडली.
रेल्वेगाडी क्रमांक ०२८८७ विशाखापट्टणम-निजामुद्दीन समता एक्स्प्रेस रात्री १०.३० वाजता कळमनाजवळ पोहोचली. या गाडीच्या जनरल कोचमध्ये श्रेयस दिगांबर गाजरे (२१) रा. वर्धा हे प्रवास करीत होते. त्यांनी काटापांजी ते नागपूर प्रवासाचे तिकीट खरेदी केले होते. कळमनाजवळ तीन अज्ञात आरोपी या गाडीत शिरले. त्यांनी प्रवाशांना धमकी देऊन त्यांचे मोबाईल हिसकावले. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचण्यापूर्वी ते मोमिनपुरा येण्यापूर्वी गाडीखाली उतरले. यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर येताच गाजरे यांनी लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून याबाबत फिर्याद नोंदविली. इतरही चार प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेल्याची माहिती त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना इतवारी लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत घडल्यामुळे हे प्रकरण त्यांच्याकडे वर्ग केले जाण्याची शक्यता आहे.