नागपूरचा इतिहास मांडणारा दीर्घांक ‘वास्तुदेवता’
By Admin | Updated: June 30, 2014 00:47 IST2014-06-30T00:47:45+5:302014-06-30T00:47:45+5:30
कुठलाही इतिहास किंवा क्रांती घडते तेव्हा ती क्रांती वा इतिहास घडविणारी माणसे निघून जातात. पण अनेक वर्षे एखादी वास्तु मात्र या इतिहासाच्या पाऊलखुणा जपत असते. ही वास्तु निर्जीव असली तरी

नागपूरचा इतिहास मांडणारा दीर्घांक ‘वास्तुदेवता’
वा. कृ. चोरघडे यांच्या कथेवर आधारित नाटक : विसासंचा ‘घर आंगण’ उपक्रम
नागपूर : कुठलाही इतिहास किंवा क्रांती घडते तेव्हा ती क्रांती वा इतिहास घडविणारी माणसे निघून जातात. पण अनेक वर्षे एखादी वास्तु मात्र या इतिहासाच्या पाऊलखुणा जपत असते. ही वास्तु निर्जीव असली तरी तिला निर्जीव म्हणता येत नाही. कारण या वास्तुत सजीव माणसांच्या आठवणी असतात. सुख, दु:खाचा क्षण या वास्तुने प्रामाणिकपणे जपला असतो. अशा अनेक वास्तु असतात आणि अनेक वास्तु काळाच्या ओघात संपूनही जातात, नष्ट होतात. काही वास्तु मात्र दुर्लक्षित आणि गतवैभवाच्या आठवणीत रमल्या आहेत. नव्या पिढीला हा इतिहास समजून घ्यावासा वाटत नसला तरी याच इतिहासाच्या भरवशावर त्यांचे भविष्य घडणार असते. वा. कृ. चोरघडे यांच्या कथेवर आधारित याच आशयाचे ‘वास्तुदेवता’ हे नाटक विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलात सादर करण्यात आले.
संस्थेतर्फे ‘घर आंगण’ या उपक्रमांतर्गत या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले. चोरघडे यांच्या कथेचे नाट्यरुपांतरण पराग घोंगे यांनी केले होते. या एकांकिकेचे दिग्दर्शन विनोद इंदूरकर यांनी केले. विदर्भात भोसले घराण्याने केलेली क्रांती त्यांचा शूरत्वाचा इतिहास लखलखीत आहे. आपल्या वीरत्वाने स्वत:च्या राज्याचा विस्तार करणाऱ्या पराक्रमी राजांत भोसले घराण्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पण हा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचत नाही आणि त्यांना नागपूरकर भोसलेंचा पराक्रम कळत नाही म्हणून वा. कृ. चोरघडे यांना दु:ख होते. ही वेदना त्यांच्या वास्तुदेवता या कथेतून समोर येते. पराक्रमाचा इतिहास आहे, तसाच अंतर्गत वादही यात आहे. हा इतिहास कायम राहू शकला नाही, याची खंत या वास्तुदेवतेला आहे. ही खंत, वेदना आणि आठवण व्यक्त करणारी ही एकांकिका सादर करण्यात आली. यात पराग घोंगे आणि सीमा गोडबोले यांनी भूमिका केली. त्यांनी आपल्या अभिनयातून हा विषय दमदारपणे मांडला. नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीत संजय काशीकर यांनी सांभाळले. या उपक्रमाला नाट्यप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)