लोकमत उपविजेता
By Admin | Updated: January 16, 2015 00:58 IST2015-01-16T00:58:44+5:302015-01-16T00:58:44+5:30
टाइम्स आॅफ इंडियाने (टीओआय) गत चॅम्पियन लोकमतचा ७ गडी राखून पराभव करीत १७ व्या अलाहाबाद बँक-एसजेएएन आंतरप्रेस क्रिकेट स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळविला.

लोकमत उपविजेता
१७ वी अलाहाबाद बँक-एसजेएएन आंतरप्रेस क्रिकेट स्पर्धा
नागपूर : टाइम्स आॅफ इंडियाने (टीओआय) गत चॅम्पियन लोकमतचा ७ गडी राखून पराभव करीत १७ व्या अलाहाबाद बँक-एसजेएएन आंतरप्रेस क्रिकेट स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळविला. स्पोर्टस् जर्नालिस्ट असोसिएशन आॅफ नागपूरतर्फे (एसजेएएन) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या लोकमतचा डाव १८.५ षटकांत १०९ धावांत संपुष्टात आला. कर्णधार अमित खोडके (३१) व शरद मिश्रा (२४) यांचा अपवाद वगळता लोकमतच्या अन्य फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. टीओआयतर्फे पीयूष पाटील (४-११) सर्वांधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याला फैजुल कमर (३-१९) व उमेश टेकाडे (२-५) यांनी योग्य साथ दिली. रूपेश भाईकने (६५ धावा, ३५ चेंडू) आक्रमक अर्धशतकी खेळी करीत टीओआयला १४.५ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठून दिले. भाईकच्या अर्धशतकी खेळीत १३ चौकारांचा समावेश आहे. भाईक बाद झाल्यानंतर पीयूष पाटील (नाबाद २१) व संदीप दाभेकर (१४) यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. अलाहाबाद बँकेचे विभागीय प्रमुख के. मुरली कृष्णा, डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, मोशन ट्युटोरियल्सचे संचालक सचिन हाडके, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे सचिव शिरीष बोरकर, श्रमिक पत्रकार भवनचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी, सचिव अनुपम सोनी, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अरविंद जोशी आदींच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी दृष्टी कम्युनिकेशन्सचे संजय चिंचोळे व सीएसी आॅलराऊंडरचे अमोल खंते प्रामुख्याने उपस्थित होते. एसजेएएनचे अध्यक्ष डॉ. राम ठाकूर यांनी प्रास्ताविक केले तर सचिव किशोर बागडे यांनी संचालन केले. सहसचिव सारंग कुंटे यांनी आभार मानले. (क्रीडा प्रतिनिधी)
संक्षिप्त धावफलक
लोकमत १८.५ षटकांत सर्वबाद १०९ (अमित खोडके ३१, शरद मिश्रा २४; पीयूष पाटील ४-११, फैजुल कमर ३-१९, उमेश टेकाडे २-५, संदीप दाभेकर १-३१) पराभूत विरुद्ध टीआआय १४.५ षटकांत ३ बाद १११ (रुपेश भाईक ६५, पीयूष पाटील नाबाद २१, संदीप दाभेकर नाबाद १४; सचिन रहांगडाले व नितीन पटारिया प्रत्येकी १ बळी).
वैयक्तिक पुरस्कार
स्पर्धावीर : रवी डफ (पुण्यनगरी), सर्वोत्तम फलंदाज : रुपेश भाईक (टीओआय), सर्वोत्तम गोलंदाज : पीयूष पाटील (टीओआय), सर्वोत्तम यष्टिरक्षक : अमित रोशनखेडे (लोकमत), सर्वोत्तम क्षेत्ररक्षक : संदीप दाभेकर (टीओआय), सर्वोत्तम झेल : राम भाकरे (इंडियन एक्स्प्रेस-लोकसत्ता), पाच बळी : नितीन पटारिया, संदीप वर्धने व सचिन रहांगडाले. शतकवीर : प्रवीण लोखंडे.