महाज्योतीने केला परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचा कार्यादेश रद्द !

By आनंद डेकाटे | Published: August 3, 2023 01:09 PM2023-08-03T13:09:27+5:302023-08-03T13:09:27+5:30

लोकमत इम्पॅक्ट : चौकशी अहवालामध्ये परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने निष्काळजीपणा केल्याचे सिद्ध

Lokmat Impact : Mahajyoti cancel the mandate of the agency conducting the exam! | महाज्योतीने केला परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचा कार्यादेश रद्द !

महाज्योतीने केला परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचा कार्यादेश रद्द !

googlenewsNext

नागपूर : महाज्योतीने युपीएससी तसेच एमपीएससी प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता नियुक्त केलेल्या एजन्सीचा कार्यादेश रद्द केला आहे. खासगी एजन्सीबाबत अनेक तक्रारी व गैरप्रकार लक्षात आल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीच्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भातील आदेश महाज्योतीने गुरुवारी जारी केले. हा गैरप्रकार 'लोकमत'नेच पहिल्यांदा उघडकीस आणला होता, हे विशेष.

महाज्योतीने १६ जुलै व ३० जुलै रोजी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवरती प्रवेश परीक्षा आयोजित केली होती. १६ जुलै रोजी यूपीएससी प्रशिक्षणासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेमध्ये काही परीक्षार्थी उमेदवारांनी गैरप्रकार केल्याच्या तक्रारी महाज्योती कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. याबाबत व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले होते.

चौकशी अधिकारी यांनी परीक्षा घेणाऱ्या एजन्सी कडून गैरप्रकार केलेल्या विद्यार्थ्यांचा अहवाल मागविला होता. तसेच एमपीएससी प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षे करिता विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र निर्गमित झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या हेतूने ३० जुलै रोजी एमपीएससी प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत दरम्यान देखील विशिष्ट प्रशिक्षण संस्थेतील सराव प्रश्नपत्रिका मधील मोठ्या प्रमाणावरती प्रश्न जसेच्या तसे घेण्यात आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी महाज्योती कार्यालयाकडे केल्या होत्या.

चौकशी अहवालामध्ये परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने निष्काळजीपणा केल्याचे सिद्ध झाले आहे. परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने केलेल्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला तसेच त्यांचे आर्थिक नुकसान आणि वेळेचा अपव्यय झाल्याची बाब तसेच परीक्षा एजन्सीने केलेल्या निष्काळजीपणामुळे महाज्योतीची प्रतिमा मलीन झाल्यामुळे सामंजस्य करारातील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक खवले यांनी परीक्षा एजन्सीचा कार्यादेश रद्द करण्याचे आदेश गुरुवारी निर्गमित केले आहे.

परीक्षा पुन्हा घेण्यात येणार

यूपीएससी व एमपीएससी प्रशिक्षणासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून परीक्षा घेण्यासाठी अन्य यंत्रणेची निवड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. परीक्षेच्या वेळापत्रकाबाबतची माहिती विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या संकेतस्थळावरून कळविण्यात येणार आहे.

Web Title: Lokmat Impact : Mahajyoti cancel the mandate of the agency conducting the exam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.