लंडनमध्ये रंगला ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’ साेहळा : देशाच्या, राज्याच्या विकासावर झाले मंथन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 11:16 IST2025-08-26T11:16:04+5:302025-08-26T11:16:38+5:30

'Lokmat Global Economic Convention' held in London: लंडन येथील ‘दी सव्हॉय’ या ऐतिहासिक तसेच ब्रिटनमधील पहिल्या आधुनिक व आलिशान हॉटेलमध्ये नुकताच ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’चा शानदार साेहळा झाला. यात देशाच्या विकासावर मंथन करत भारताच्या अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणाबाबत जगभरातून आलेल्या तज्ज्ञांनी विविधांगी चर्चा केली.

'Lokmat Global Economic Convention' held in London: Brainstorming on the development of the country and state | लंडनमध्ये रंगला ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’ साेहळा : देशाच्या, राज्याच्या विकासावर झाले मंथन

लंडनमध्ये रंगला ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’ साेहळा : देशाच्या, राज्याच्या विकासावर झाले मंथन

गातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणारी आणि आज चौथ्या क्रमांकावर पोहोचलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेत अमर्याद क्षमता आहेत. तथापि, आंतरराष्ट्रीय स्तरावर काही शक्ती भारताच्या वाटचालीत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेकडून आकारण्यात आलेल्या टॅरिफमुळे नवे आव्हान निर्माण झाले आहे. तरीही, भारतीय अर्थव्यवस्थेतील सामर्थ्य अबाधित असून, एकट्या महाराष्ट्रात पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची क्षमता आहे. येत्या काळात ‘आत्मनिर्भरते’च्या बळावर जागतिक पटलावर उंच भरारी घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचा ठाम विश्वास येथे जागतिक मंचावरून व्यक्त केला.

लंडन येथील ‘दी सव्हॉय’ या ऐतिहासिक तसेच ब्रिटनमधील पहिल्या आधुनिक व आलिशान हॉटेलमध्ये नुकताच ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’चा शानदार साेहळा झाला. यात देशाच्या विकासावर मंथन करत भारताच्या अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणाबाबत जगभरातून आलेल्या तज्ज्ञांनी विविधांगी चर्चा केली. विशेषत: अमेरिकेने लावलेल्या टॅरिफमुळे निर्माण झालेल्या अडचणीवर मात करण्यासाठी काेणत्या क्षेत्रांमध्ये भारताला संधी आहे याच्या उपाययाेजनांवरही सकारात्मक संवाद घडून आल्याने या कन्व्हेन्शनचे महत्त्व अधाेरेखित झाले.

‘नेतृत्व अन् ऐक्य यातच प्रगती’  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत ठामपणे उभा आहे. महाराष्ट्राला मुख्यमंत्री फडणवीस पुढे नेत आहेत. नेतृत्व आणि ऐक्य हीच प्रगतीची खरी गुरुकिल्ली असल्याचे मत ‘सन मार्क’चे संस्थापक  लॉर्ड रामी रेंजर यांनी व्यक्त केले. 

उत्कर्षाच्या नव्या पर्वाची सुरुवात
‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’मध्ये भारताची अर्थव्यवस्था, महाराष्ट्रातील विकासाची संधी, पायाभूत विकासाची दिशा, महिलांची क्षमतावृद्धी व उद्यमशीलता या विषयांवर चर्चासत्र झाले. यात अर्थतज्ज्ञ, उद्याेजक, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी यांनी सहभाग घेतला. ‘लोकमत’चे ‘एडिटर इन चिफ’ राजेंद्र दर्डा व ‘लोकमत’चे सहव्यवस्थापकीय व संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी संवादकाची भूमिका बजावत वैचारिक मंथन घडवून आणले. 

भारताकडून विकासाचा सल्ला
आज प्रत्येक मोठ्या देशाच्या संसद व निर्णय मंडळात भारतीय आहेत. जगातील अनेक देश भारतीयांकडून विकासाबाबत सल्ला घेतात, हे देशाच्या क्षमतेचे प्रतीक आहे.    
 - अनिल अग्रवाल, चेअरमन, वेदांता ग्रुप

पर्यटन : गुंतवणूक संधी वाढावी
भारताला समृद्ध इतिहास, संस्कृती आणि शौर्याचा वारसा लाभला आहे. योग्य गुंतवणुकीच्या माध्यमातून आपण पर्यटन विकासाला चालना देत ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था लवकरच होऊ.
प्रकाश छाब्रिया, चेअरमन, फिनोलेक्स इंडस्ट्रीज 

मान्यवरांची उपस्थिती
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री याेगेश कदम, राज्यमंत्री पंकज भाेयर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी अर्थमंत्री सुनील तटकरे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, इंग्लंडमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा, ‘लोकमत’चे ‘एडिटर इन चिफ’ राजेंद्र दर्डा, वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल, सन मार्क कंपनीचे संस्थापक व हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य लॉर्ड रामी रेंजर, गल्फ ऑईल इंटरनॅशनलचे चेअरमन संजय हिंदुजा, प्रसिद्ध उद्योजक अभय भुतडा, अभिनेता सुनील शेट्टी, बॅंकर व पार्श्वगायिका अमृता फडणवीस आदी उपस्थित होते. ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर व वरिष्ठ उपाध्यक्ष विजय शुक्ला यांनी मान्यवरांचे स्वागत केले. ‘लोकमत’चे वरिष्ठ महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांनी प्रास्ताविक केले, तर अभिनेत्री गिरिजा ओक यांनी सूत्रसंचालन केले.

‘स्मार्ट व्हिलेज’मध्ये देशाच्या विकासाचे सूत्र : नितीन गडकरी
पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधांवर पंतप्रधान मोदींनी जास्त भर दिला. देशात ६५ टक्के जनता गावांमध्ये राहते. एकीकडे ‘स्मार्ट सिटी’ बनत असताना ‘स्मार्ट व्हिलेजेस’ बनविण्याचीही गरज आहे. गावांमध्ये आवश्यक सुविधा नसल्याने नाइलाजाने लोक शहरात स्थलांतरित होतात. जर तेथे सुविधांचा विकास केला तर गावांची स्थिती बदलू शकते. गावांतील लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढविण्याची गरज आहे व याचा संबंध सिंचनासोबत आहे.सिंचनालादेखील प्राधान्य दिले पाहिजे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री गडकरी यांनी व्यक्त केले. 

पुढील शंभर दिवस ठरवतील बदलांचा वेग : पीयूष गोयल
केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गाेयल आभासी पद्धतीने सहभागी झाले. ते म्हणाले, लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी भारताला जलद गतीने पुढे नेण्याचे आणि २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचे आवाहन केले होते. भारतासाठी हीच योग्य वेळ आहे.  यूएई, ऑस्ट्रेलिया, मॉरिशस, स्वित्झर्लंड, यूके, नॉर्वे यांसारख्या देशांसोबत आपण मुक्त व्यापार करार केले. मेड इन इंडिया उत्पादनांसाठी बाजारपेठही शोधत आहोत. पुढील १०० दिवसांत आम्ही पंतप्रधान मोदी यांनी १५ ऑगस्टला दिलेल्या आवाहनाचे पालन करू.

प्रगतीचा वेग कुणीही थांबवू शकत नाही : देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन माध्यमातून  आपली सविस्तर भूमिका मांडली. “भारत भूषण पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी आभारी आहे. मला प्रत्यक्ष उपस्थित राहायचे होते, पण ते शक्य झाले नाही,” असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भारत झपाट्याने प्रगती करत आहे. पाच नव्हे, तर दहा ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न आपण पाहत आहोत. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आधीच अर्धा ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठून एक ट्रिलियनच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे ते म्हणाले. 

महाराष्ट्र हाच देशाचा आर्थिक ऊर्जास्रोत : डॉ. विजय दर्डा
आतरराष्ट्रीय व्यापारातील अस्थिरता आणि  टॅरिफमुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर भाष्य करताना ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डॉ. विजय दर्डा म्हणाले, भारताने संकटांना नेहमीच संधींमध्ये बदलले आहे. महाराष्ट्र हाच देशाचा आर्थिक ऊर्जास्रोत असून या प्रगतीचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते. एकट्या महाराष्ट्रात पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची क्षमता आहे. ही ताकद जगापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. ब्रिटनसह पाच देशांसोबत व्यापार करारामुळे अमेरिकेच्या दबावातून दिलासा मिळाल्याचे ते म्हणाले. 

आर्थिक महासत्तेचे ध्येय निश्चित गाठू : राजेंद्र दर्डा
लोकमत मीडिया ग्रुपचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा म्हणाले, लंडनमध्ये थेम्स नदीच्या तीरावर झालेल्या ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’च्या व्यासपीठावर अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरच्या उंबरठ्यावर पोहोचविताना महाराष्ट्र महत्त्वाचा प्रवर्तक ठरणार आहे. अनेक क्षेत्रात आपण आघाडीवर असून काही क्षेत्रांत थोडे काम करण्याची आवश्यकता आहे. भविष्यात महाराष्ट्र हेच देशाच्या इकाॅनाॅमिचे पाॅवर हाऊस असणार आहे. पुढील दहा वर्षांत देश आर्थिक विकासाच्या दिशेने नक्की झेपावेल.

Web Title: 'Lokmat Global Economic Convention' held in London: Brainstorming on the development of the country and state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.