जिद्दीने लढला लोकेश वडिलांचे छत्र हरविले
By Admin | Updated: June 3, 2014 03:10 IST2014-06-03T03:10:33+5:302014-06-03T03:10:33+5:30
वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्याने वडिलांचे छत्र गमावले.

जिद्दीने लढला लोकेश वडिलांचे छत्र हरविले
राकेश घानोडे नागपूर वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्याने वडिलांचे छत्र गमावले. त्याच्यावर दु:खाचा पहाड कोसळला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळली. परंतु आईने आत्मविश्वास जागवल्याने तो जिद्दीने लढला. आज इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये वाणिज्य शाखेच्या मराठी माध्यमात त्याने ७५.८४ टक्के गुण मिळवून उज्जवल भविष्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. लोकेश संजय गौरकर असे या होतकरू विद्यार्थ्याचे नाव असून तो विश्वकर्मानगरात राहतो. लोकेशची आई सुनीता खासगी नोकरी करीत असून, लहान भाऊ रोहित इयत्ता नववीला आहे. त्याचे वडील संजय रेल्वेमध्ये कार्यरत होते. लोकेश अवघा पाच वर्षांंचा असताना संजय यांचे आजारपणामुळे निधन झाले. लोकेशला अधिकारीपदावर कार्य करताना पाहण्याची त्यांची इच्छा होती. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकेश अथक परिश्रम घेत आहे. काँग्रेसनगर येथील न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे. लोकेशची आई शिक्षणाबाबत प्रचंड आग्रही आहे. कितीही खर्च लागला तरी मुलांनी शिकून मोठे झाले पाहिजे, असे त्या म्हणतात. यामुळे त्यांनी आजपर्यंंत टीव्ही खरेदी केला नाही. लोकेशने एकदा टीव्ही मागितला होता, पण आईने समजावल्यानंतर पुन्हा त्याने हा विषय काढला नाही. लोकेशची सी.ए. होण्याची इच्छा आहे. बारावीत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले असले तरी ही उणीव बी. कॉम.मध्ये भरून काढण्याची त्याची जिद्द आहे. आईला लोकेशकडून ८0 टक्क्यांवर गुणांची अपेक्षा होती. कमी गुण मिळाले असले तरी त्यांनी लोकेशला आत्मविश्वासाने पुढे जाण्यास सांगितले आहे. लोकेश रोज सात-आठ तास अभ्यास करीत होता. महाविद्यालयाला दांडी मारत नसल्यामुळे त्याच्याकडे शिक्षकांचे विशेष लक्ष होते. त्याने मोरे सरांचा विशेष उल्लेख केला. समस्या घेऊन गेल्यानंतर मोरे सरांनी कधीच निराश करून परत पाठविले नाही, असे लोकेशने सांगितले. हस्ताक्षर वाईट असल्यामुळे गुणांवर परिणाम पडल्याचे लोकेशने प्रामाणिकपणे स्पष्ट करतानाच, ही त्रुटी दूर करण्यासाठी परिश्रम घेणार असल्याचे सांगितले.