लोका सांगे ब्रह्मज्ञान!

By Admin | Updated: May 7, 2017 02:04 IST2017-05-07T02:04:50+5:302017-05-07T02:04:50+5:30

एरवी एखादा विद्यार्थी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यालयात एखाद्या कामाने थोडासा उशिरा गेला तर

Loka Sangay Brahmagyan! | लोका सांगे ब्रह्मज्ञान!

लोका सांगे ब्रह्मज्ञान!

लेटलतिफ कर्मचाऱ्यांचे
काणे पकडतील का कान ?
हे विद्यापीठ आहे की
कर्मचाऱ्यांची मालमत्ता ?
बायोमेट्रिकची सक्ती मात्र
त्यावरही कर्मचाऱ्यांची युक्ती

योगेश पांडे / सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एरवी एखादा विद्यार्थी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यालयात एखाद्या कामाने थोडासा उशिरा गेला तर त्याला कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून लगेच वेळेचा फलक दाखविण्यात येतो. मात्र विद्यार्थी, महाविद्यालयांना ज्ञान पाझळणाऱ्या नागपूर विद्यापीठातच दिव्याखाली अंधार आहे. लोकांना ब्रह्मज्ञान आणि शिस्तीचे धडे देणाऱ्या नागपूर विद्यापीठात नियम पाळले जातात का, याचा शोध घेण्याचा लोकमतने प्रयत्न केला. यात कार्यालयीन वेळेत बहुतांश कर्मचारी आणि अधिकारी अनुुपस्थित दिसून आले. त्यामुळे कुलगुरु डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना आता कर्मचारीही चकवा देतात का ? हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. प्रशासनाची धूरा सांभाळणाऱ्या कुलगुरू, कुलसचिव कार्यालयासह अनेक विभागातील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा फटका सामान्य विद्यार्थ्यांना बसत आहे. लोकमतने ‘हजेरीनामा’ अभियानांतर्गत विद्यापीठातील अनेक विभागांचा शनिवारी सकाळी आढावा घेतला. यात विद्यापीठातील अनेक विभागांचे महत्त्वाचे अधिकारी, कर्मचारी कार्यालयात उशिरा पोहोचत असल्याचे उघड झाले. सकाळी १० वाजता फारच थोडे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. लोकांना ब्रह्मज्ञान सांगणाऱ्या विद्यापीठाला शिस्त लावण्यासाठी कुलगुरू काही ठोस पावले उचलतील, का असा सार्वत्रिक सवाल केला जात आहे.

कुलगुरू कार्यालय
कुलगुरू कार्यालयात सकाळी १०.०८ वाजता ‘लोकमत’च्या चमूने पाहणी केली. कुलगुरू कार्यालयाचे उपकुलसचिव प्रदीप बिनीवाले व कार्यालयातील चपराशी वगळता इतर कुणीही कार्यालयात नव्हते. कुलगुरू कार्यालयातीलच कर्मचारी वेळ पाळत नसतील तर या कार्यालयाचा प्रशासनावर वचक कसा राहणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्र-कुलगुरू कार्यालय
प्र-कुलगुरूंच्या कार्यालयात ‘लोकमत’ची चमू पोहोचली त्यावेळी तेथे एक कर्मचारी वगळता सर्व जण दिसून आले. मात्र संबंधित कर्मचाऱ्याचे सामान जागेवर दिसत होते. चौकशी केली असता ते गाडीच्या डिक्कीतून चष्मा आणायला ‘पार्किंग’मध्ये गेल्याचे कळले.

कुलसचिव कक्ष
कुलसचिव पूरण मेश्राम सध्या रजेवर असून त्यांच्या गैरहजेरीत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांच्याकडे ही जबाबदारी आहे. मात्र या कार्यालयात दोन कर्मचारी सोडले तर इतर कुणीही उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे कार्यालयातील सर्व लाईट, फॅन व कूलर सुरू होते.

महाविद्यालयीन शाखा
नागपूर विद्यापीठाच्या महाविद्यालयीन शाखेत वेगळे चित्र नव्हते. येथे कुठलाही अधिकारी उपस्थित नव्हता. सहायक कुलसचिव रमेश मदने हे वेळेवर आले नव्हते. एक महिला कर्मचारी सोडली तर या विभागात एकही कर्मचारी आला नव्हता. मात्र विभागातील सर्व ‘एसी’, लाईट, पंखे सुरू होते.

 

Web Title: Loka Sangay Brahmagyan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.