कामगारांना लॉकडाऊनची, तर उद्योजकांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:07 IST2021-04-14T04:07:32+5:302021-04-14T04:07:32+5:30
- उद्योग-व्यवसायावर परिणाम होणार : निर्मिती उद्योग थांबणार नागपूर : महाराष्ट्रात कोरोना संसर्ग आणि रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने ...

कामगारांना लॉकडाऊनची, तर उद्योजकांना
- उद्योग-व्यवसायावर परिणाम होणार : निर्मिती उद्योग थांबणार
नागपूर : महाराष्ट्रात कोरोना संसर्ग आणि रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने उद्योग-व्यावसायिकांसोबतच कामगार वर्गही धास्तावला आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने ६ ते ३० एप्रिलपर्यंत ‘ब्रेक द चेन’ अभियान अर्थात लॉकडाऊन लावले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद आहेत. हे लॉकडाऊन उद्योगांसाठी नाही, पण कोरोनाचा संसर्ग झाल्यास काय करायचे, असा गंभीर प्रश्न कामगारांसमोर उभा राहिला आहे. उद्योजकांनी कामगारांना अतिरिक्त सेवा देऊन त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. त्यानंतरही कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कामगार पुन्हा आपल्या गावी परतले, तर त्यांना पुन्हा कसे आणणार, अशी चिंता उद्योजकांना सतावत आहे. शिवाय त्याचा निर्मिती उद्योगांना फटका बसणार आहे.
एकदा कामगार मूळ गावी परतला तर तो चार महिने परत येत नाही, असा अनुभव उद्योजकांना गेल्यावर्षी आला आहे. त्यामुळे उद्योजक कामगारांना दिलासा देत त्यांच्या लसीकरणाची व्यवस्था करीत आहेत. जिल्ह्यातील सर्वच उद्योग संघटनांनी कामगारांच्या लसीकरणासाठी शासनाकडे मागणी करून व्यवस्था केली आहे. ही कामगारांसाठी दिलासादायक स्थिती असली तरीही, त्यांच्या आणि कुटुंबीयांच्या मनात कोरोनाची भीती आहेच. गेल्यावर्षी मूळ गावी कामगार कुटुंबीयांसह परत गेले होते, पण अनेकजण कामावर येताना एकटेच आले. त्यामुळे मूळ गावी जाण्यासाठी त्यांच्यात ओढ निर्माण झाली आहे. अनेक कामगार कर्ज घेऊन घरी परतले आहेत. ही संख्या आता वाढू लागली आहे. कामगार गेले तर त्यांना पुन्हा आणणे कठीण होणार आहे. त्याचा परिणाम उद्योगांवर होणार असल्याची धास्ती उद्योजकांमध्ये निर्माण झाली आहे.
कामगार कुठे, किती?
- औद्योगिक वसाहत ५५ ते ६० हजार
- हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसाय २३ ते २५ हजार
- बांधकाम व्यवसाय १८ ते २१ हजार
---------------
गेल्यावर्षी ३० हजार कोटींचे नुकसान!
गेल्यावर्षी २५ मार्च ते २० जून या काळात केंद्र सरकारने लॉकडाऊन लावल्याने महाराष्ट्रातील सर्वच उद्योग-धंदे बंद झाले. केंद्र सरकारने २० जूनपासून अनलॉक सुरू केले, पण अनेक उद्योजकांनी कामगारांअभावी उद्योग सुरू केले नाहीत. उद्योग जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सुरू झाले. याशिवाय शोरूम आणि दुकाने सुरू झाल्यानंतरही बाजारपेठेत ग्राहकांचा अभाव होता. हळूहळू उद्योग-धंद्यांची साखळी सुरू झाल्यानंतर दसऱ्याच्या सणाला चांगले दिवस आले. पण लॉकडाऊनमुळे निर्मिती उद्योग आणि दुकाने बंद असल्याने प्राप्त आकडेवारीनुसार गेल्यावर्षी जवळपास ३० हजार कोटींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. त्यामुळे शासनाचे हजारो कोटींचे महसुलाचे नुकसान झाले.
उद्योजकांच्या प्रतिक्रिया :
कामगारांना देत आहोत सुविधा
कामगार पुन्हा मूळ गावी परत गेला, तर उद्योगात वस्तूंची निर्मिती थांबणार आहे. कामगार परत केव्हा येणार, हे सांगता येणार नाही. त्यामुळे सर्व कामगारांसाठी लसीकरणाची व्यवस्था केली आहे. शिवाय त्यांच्या कुटुंबीयांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कामगारांना थांबविण्याचा प्रयत्न आहे.
- प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज असोसिएशन.
कामगारांसाठी लसीकरण
कामगार आपल्या गावी परतला, तर उद्योगांचे नुकसान होणार आहे. अशा परिस्थितीत नवीन कुशल कामगारांची भरती करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना विविध सोयी पुरविण्यात येत आहेत. लसीकरणावर भर आहे. शिवाय त्यांना आर्थिक मदत करण्यात येत आहे. कामगार परत जाऊ नयेत म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत.
- चंद्रशेखर शेगावकर, अध्यक्ष, हिंगणा एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशन.
कामगारांचे ‘ब्रेन वॉश’
कळमेश्वर औद्योगिक वसाहतीत ११० पेक्षा जास्त उद्योग सुरू आहेत. सर्व उद्योगांत निर्मिती वाढली आहे. पण आता कोरोनाचे संकट वाढल्याने अनेक कामगार मूळ गावी परतण्यासाठी उत्सुक आहेत. अशा कामगारांचे ब्रेन वॉश करण्यात येत आहे. कामगार गेल्यास ते केव्हा परत येतील, याची चिंता आहे.
- अमर मोहिते, अध्यक्ष, कळमेश्वर इंडस्ट्रीज असोसिएशन.
कामगारांच्या प्रतिक्रिया :
पगार नाही, थांबणार नाही
उद्योगात निर्मिती थांबली आहे. त्यामुळे पगाराची चिंता सतावत आहे. कुटुंब गावी असल्याने त्यांना पैसा पाठविता येणार नाही. त्यामुळे गावी जाऊन थोडाफार व्यवसाय करून पैसे कमावू. त्यामुळे गावी परतणार आहे.
- केवल वर्मा, कामगार.
कोरोना काळात गावच चांगले
कोरोना संसर्गाची भीती सतत सतावत आहे. रुग्णालयांची स्थिती भयंकर आहे. लसीकरण झाले आहे. कोरोना झाल्यास पैसे आणणार कुठून, याची भीती आहे. कोरोना काळात आमच्यासाठी गावच चांगले आहे.
- भोलाप्रसाद त्रिवेदी, कामगार.
आठवड्यापासून काम नाही
आठवड्यापासून हाताला काम नाही, शिवाय अर्धा पगार सुरू आहे. अशा स्थितीत कुटुंबाचा खर्च कसा चालवायचा, हा प्रश्न सतावत आहे. त्यामुळे जमा रकमेसह गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
- श्यामसुंदर विश्वास, कामगार.