लाॅकडाऊनमुळे घरकुलाची कामे रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:09 IST2021-05-09T04:09:25+5:302021-05-09T04:09:25+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बेलाेना : शासनाच्या इंदिरा आवास याेजनेंतर्गत माेठ्या प्रमाणात घरकुल मंजूर केल्यानंतर गावांमध्ये बांधकाम सुरू झाले. परंतु, ...

लाॅकडाऊनमुळे घरकुलाची कामे रखडली
लाेकमत न्यूज नेटवर्क
बेलाेना : शासनाच्या इंदिरा आवास याेजनेंतर्गत माेठ्या प्रमाणात घरकुल मंजूर केल्यानंतर गावांमध्ये बांधकाम सुरू झाले. परंतु, लाॅकडाऊनमुळे साहित्य मिळेनासे झाल्याने घरकुलाची कामे ठप्प पडली आहेत. दुसरीकडे दुकाने बंदच्या सबबीखाली बांधकाम साहित्याची चढ्या दराने विक्री केली जात आहे. यामुळे लाभार्थींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
एकीकडे कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. दुसरीकडे पावसाळ्यापूर्वी छत तयार होईल का, हा प्रश्न घरकुलधारकांपुढे आहे. लाॅकडाऊनमुळे बेरोजगारी असल्याने उदरनिर्वाह कसा करावा, घरकुलाकरिता कुठून पैसा आणावा, हे मुद्दे प्रकर्षाने पुढे आले आहेत. यामुळे शासनाने या योजनेचा निधी वाढवून द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. टाळेबंदीच्या आड बांधकाम साहित्याचे भाव माेठ्या प्रमाणात वाढले. यामुळे सिमेंट, लाेखंड आदी साहित्य खरेदी करताना लाभार्थींना आर्थिक समस्यांना सामाेरे जावे लागते. दुकाने बंद असल्याने दुकानदार याचा फायदा घेताना दिसत आहेत. त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने कुणाकडे दाद मागावी, हा प्रश्नच आहे. दुसरीकडे गावांमध्ये घरकुलाचे बांधकाम सुरू असल्याने जागाेजागी रेती, विटा, साहित्य पडून आहे. मात्र, मजूर मिळत नसल्याने घरकुलाची कामे ठप्प आहेत.