लॉकडाऊन ऑटो डीलर्ससाठी ठरला अभिशाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 11:15 AM2020-04-29T11:15:21+5:302020-04-29T11:16:06+5:30

कोरोना लॉकडाऊन ऑटोमोबाईल डीलर्ससाठी अभिशाप ठरला असून गाड्यांची विक्री न झाल्याने कोट्यवधींचे नुकसान सोसावे करावे लागत आहे. मार्च (गुढीपाडवा) आणि एप्रिल महिन्यात नागपूर जिल्ह्यात सर्व कंपन्यांच्या डीलर्सकडे एकूण ५ हजार कार आणि २० हजार दुचाकींची विक्री झालेली नाही.

Lockdown is a curse for auto dealers | लॉकडाऊन ऑटो डीलर्ससाठी ठरला अभिशाप

लॉकडाऊन ऑटो डीलर्ससाठी ठरला अभिशाप

Next
ठळक मुद्देदोन महिन्यात ५ हजार चारचाकी व १० हजार दुचाकींची विक्री ठप्पआर्थिक पॅकेजची अपेक्षा

मोरेश्वर मानापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना लॉकडाऊन ऑटोमोबाईल डीलर्ससाठी अभिशाप ठरला असून गाड्यांची विक्री न झाल्याने कोट्यवधींचे नुकसान सोसावे करावे लागत आहे. मार्च (गुढीपाडवा) आणि एप्रिल महिन्यात नागपूर जिल्ह्यात सर्व कंपन्यांच्या डीलर्सकडे एकूण ५ हजार कार आणि २० हजार दुचाकींची विक्री झालेली नाही. दुसरीकडे बँकांच्या कर्जावरील व्याजाचा बोजा वाढतच आहे. नागपूर रेड झोनमध्ये असल्याने लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढणार आहे. त्यामुळे मे महिनाही विक्रीविना जाण्याची शक्यता आहे. कर्जावरील व्याज, नियमित खर्च आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराचा बोजा वाढतच असल्याने काही कंपन्यांच्या डीलरशिप बंद होण्याची भीती डीलर्सनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
आदित्य हीरो आणि टाटा मोटर्सचे डीलर्स डॉ. पी.के. जैन म्हणाले, कार लक्झरी वस्तू असल्याने लोक आर्थिक संकटामुळे खरेदी करण्यास वर्षभर टाळाटाळ करतील. तसे पाहता ऑटोमोबाईल क्षेत्र गेल्या अडीच वर्षांपासूनच मंदीत आहे. विक्रीत १५ ते २० टक्के घट झाली आहे. डीलर्सचे संकट तेव्हापासून सुरू झाले आहे. कोरोनाने त्यात भर टाकली आहे. ऑटो क्षेत्रावर २८ टक्के जीएसटी आहे. १० लाखांवरील कारवर सर्व करांसह तब्बल ५२ टक्के कर आकारला जात आहे. त्यामुळे लक्झरी कारची विक्री कमीच झाली आहे. तसेच दुचाकी खरेदी करताना ग्राहकाला २८ टक्के जीएसटी आणि सहा वर्षांचा रोड विमा भरावा लागतो. या करांमुळे गाड्यांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे आवश्यक असल्यास ग्राहक खरेदी करीत आहेत.

कोरोनामुळे ऑटो क्षेत्रावर आलेले आर्थिक संकट वर्षभर राहणार आहे. विक्रीवर आघात झाल्याने मोठ्या डीलर्सलाही मासिक खर्च चालविणे कठीण होणार आहे. मार्च महिन्यात अनेकांनी दुचाकी आणि कारचे बुकिंग केले आहे. पण त्यातील कितीजण डिलिव्हरी घेतात, याचे उत्तर लॉकडाऊननंतर मिळणार आहे. बँकांनी तीन महिन्याचे हप्ते थांबविले असले तरीही कर्जावरील व्याज सुरूच आहे. संकटात असलेल्या या क्षेत्राला उभारी देण्यासाठी बँकांनी कमी व्याजदरात कर्ज द्यावे आणि पूवीर्चे व्याज माफ करावे आणि शासनाने प्रोत्साहनपर आर्थिक पॅकेज देऊन दिलासा द्यावा, असे पी.के. जैन यांनी सांगितले.

बीएस-४ गाड्या विकण्याचा मोठा प्रश्न
दुसरीकडे बीएस-४ च्या नियमाने डीलर्सचा व्यवसाय जानेवारीपासून मंदीत आहे. बीएस-६ च्या गाड्या खरेदीसाठी ग्राहकांनी बीएस-४ ची खरेदी थांबविली आहे. १५ मार्चपर्यंत गाड्यांची थोडीफार विक्री झाली, पण १९ मार्चपासून लॉकडाऊन झाल्याने डीलर्सकडे असलेल्या गाड्यांची विक्री पूर्णपणे थांबली आहे. बीएस-४ गाड्यांना ३० एप्रिलपर्यंत आरटीओकडे नोंदणीची मुदत दिली असली तरीही एप्रिलमध्ये शोरूम बंद असल्याने दुचाकी आणि चारचाकीची विक्री झालीच नाही. त्यामुळे नोंदणीचा प्रश्नच नाही. त्यामुळे बीएस-४ च्या गाड्या डीलर्सकडे विक्रीविना पडून राहणार आहेत. त्याचा आर्थिक भुर्दंड डीलर्सना बसणार आहे. पुढे देशाची अर्थव्यवस्था कशी राहणार, यावर ऑटोमोबाईलचे भविष्य अवलंबून आहे. पण वर्ष २०२० ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी संकटाचे राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एन्टी सेक्शन अर्थात दुचाकीची विक्री राहील, पण चारचाकीची विक्री फारच कमी राहील, असे जैन यांनी सांगितले.

कोरोनामुळे आर्थिक संकट
इरोज मोटर्सचे महाव्यवस्थापक सूरज भुसारी म्हणाले, मार्चमध्ये अनेक ग्राहकांनी ह्युंडई कारची नोंदणी केली. अनेकांना गुडीपाडव्याला डिलिव्हरी देण्यात येणार होती. पण लॉकडाऊनमुळे शक्य झाले नाही. कोरोनामुळे अनेकांच्या रोजगारावर संकट आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. लॉकडाऊन हटल्यानंतर कितीजण कारची डिलिव्हरी घेतील, त्यावरही प्रश्नचिन्ह आहे. अशीच स्थिती अन्य कंपन्यांच्या डीलर्सकडे राहणार आहे. शोरूम बंद असली तरही बँकांचे कर्जावरील व्याज सुरूच आहे. युरो-४ गाड्यांच्या नोंदणी ३० एप्रिलपर्यंत असल्याने विक्रीविना राहिलेल्या कारचे काय करायचे, हा प्रश्न उभा राहिला आहे. कोरोनामुळे दोन महिन्यातच ऑटो डीलर्सना कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागत असल्याचे भुसारी यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Lockdown is a curse for auto dealers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.