-तर नागपुरात पुन्हा लॉकडाऊन : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 07:59 PM2020-07-11T19:59:28+5:302020-07-11T20:01:02+5:30

नागपुरात गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढलेली कोविड-१९ रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सुरू झालेल्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत नागरिकांना दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची सूट देण्यात आली. मात्र, नागपुरात नागरिकांकडून दिशानिर्देशाचे पालन होत नाही, हे गेल्या काही दिवसात रुग्णसंख्येत झालेल्या वाढीने सिद्ध केले आहे. यापुढेही जर अशीच परिस्थिती राहिली तर नागपुरात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

Lockdown again in Nagpur: Municipal Commissioner Tukaram Mundhe's warning | -तर नागपुरात पुन्हा लॉकडाऊन : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा

-तर नागपुरात पुन्हा लॉकडाऊन : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देदिशानिर्देशाचे कडक पालन करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढलेली कोविड-१९ रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सुरू झालेल्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत नागरिकांना दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची सूट देण्यात आली. मात्र, नागपुरात नागरिकांकडून दिशानिर्देशाचे पालन होत नाही, हे गेल्या काही दिवसात रुग्णसंख्येत झालेल्या वाढीने सिद्ध केले आहे. यापुढेही जर अशीच परिस्थिती राहिली तर नागपुरात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.
नागपुरातील कोरोनाच्या परिस्थितीवर शनिवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी कोरोनासंदर्भात नागपुरातील परिस्थितीवर भाष्य केले. मुंढे म्हणाले, नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्च रोजी आढळला होता. आज ११ जुलै आहे. चार महिन्यात रुग्णांची संख्या १७८९ इतकी आहे. मात्र, ही संख्या गेल्या दीड महिन्यात झपाट्याने वाढली. राज्य शासनाने १ जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत मिशन बिगीन अगेन सुरु केले. याअंतर्गत काही बंधने पाळून आणि दिशानिर्देशाचे पालन करून नागरिकांना आपले दैनंदिन व्यवहार करण्याची मुभा दिली. जर आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडूच नये, असेही राज्य शासनाने म्हटले होते. मात्र, राज्य शासन आणि स्थानिक पातळीवर महानगरपालिकेने दिलेल्या दिशानिर्देशाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे लक्षात आले आहे. ही परिस्थिती अशीच राहिली, नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर आणखी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे दिशानिर्देर्शांचे पालन करा, स्वत: सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

उल्लंघन करणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल
लॉकडाऊनचा निर्णय घेण्याअगोदर सोमवारपासून मनपा आणि पोलीस प्रशासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वॉच ठेवणार आहे. कुणी नियम तोडताना आढळून आल्यास मनपा आणि पोलीस नियंत्रण कक्षाला त्याची माहिती नागरिकांनी द्यावी. अशा नियम मोडणाऱ्या व्यक्ती, संस्था, खासगी कार्यालये आदींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. वेळप्रसंगी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

दुकानदार व ग्राहक मोडताहेत नियम
दुकाने सुरू करण्यासंदर्भातील काही नियम आहेत. बाजार परिसरातील दुकाने एका बाजूची एक दिवस आणि दुसऱ्या बाजूची दुसऱ्या दिवशी उघडावी, तसे दिवस ठरवून देण्यात आले आहेत. दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ७ अशी आहे. मात्र, हा नियमही पाळला जात नाही. दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर करावा या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी दुकान मालकांची आहे. त्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

अकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढली
अनेक जण विनाकारण शहरात फिरत आहे. दुचाकींवर दोन व्यक्ती तर चार चाकी वाहनांत पाच-पाच व्यक्ती फिरत आहे. परिणामी आता नागपूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

खासगी कार्यालयांमध्येही उल्लंघन
खासगी किंवा शासकीय कार्यालयात १५ व्यक्ती किंवा १५ टक्के यापेक्षा जी संख्या अधिक असेल त्या संख्येत कर्मचाऱ्यांना बोलावून काम करण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु त्याचेही उल्लंघन होत आहे.

मध्यवर्ती कारागृह नवा हॉटस्पॉट
नागपूर मध्यवर्ती कारागृहातील ५०० कैद्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी सुमारे ३०० कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. अजून सुमारे १२०० जणांची चाचणी व्हायची आहे. त्यातून मोठा आकडा समोर येण्याची शक्यता आहे. एकंदरच मध्यवर्ती कारागृह आता कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झाला आहे. असे हॉटस्पॉट नागपूर शहरात इतरत्र तयार होऊ नये, असे वाटत असेल तर कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी दिशानिर्देशाचे पालन करा, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

Web Title: Lockdown again in Nagpur: Municipal Commissioner Tukaram Mundhe's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.