वनदेवीनगरातील अतिक्रमण कारवाई दरम्यान तणाव; पोलीसांच्या मदतीने विभागाने २७ घरांचे अतिक्रमण काढले
By मंगेश व्यवहारे | Updated: February 21, 2023 19:38 IST2023-02-21T19:37:54+5:302023-02-21T19:38:24+5:30
उत्तर नागपुरातील वनदेवीनगरातील नाल्याच्या काठावरील फुटपाथवर अवैध पद्धतीने बांधण्यात आलेले घरावर अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या मनपाच्या प्रवर्तन विभागाला स्थानिकांनी जोरदार विरोध केला.

वनदेवीनगरातील अतिक्रमण कारवाई दरम्यान तणाव; पोलीसांच्या मदतीने विभागाने २७ घरांचे अतिक्रमण काढले
नागपूर : उत्तर नागपुरातील आसीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या वनदेवीनगरातील नाल्याच्या काठावरील फुटपाथवर अवैध पद्धतीने बांधण्यात आलेले घरावर अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या मनपाच्या प्रवर्तन विभागाला स्थानिकांनी जोरदार विरोध केला. ही कारवाई थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकं एकत्र आली होती. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर पोलीसांच्या बंदोबस्तात पथकाने २७ घरांचे अतिक्रमण काढले.
आशीनगर झोन अंतर्गत ईटाभट्टी चौक येथील वनदेवीनगर नाल्या काठावर अवैध पद्धतीने घरे बांधण्यात आले होते. अतिक्रमणाच्या संदर्भात उच्च न्यायालयाने मनपा प्रशासनाला सुनावल्यानंतर महापालिकेचा अतिक्रमण विभागाने शहरातील अतिक्रमण झालेले रस्ते व फुटपाथ मोकळे करण्यासाठी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या अंतर्गत मंगळवारी अतिक्रमणाचे पथक जेसीबी घेऊन वनदेवीनगरात कारवाईसाठी गेले असता, शेकडोच्या संख्येने लोकं एकत्र झाले. त्यांनी कारवाईला प्रचंड विरोध केला. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर अतिक्रमण विभागाने पोलीसांना सूचना केली. यशोधरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण आपली कुमक घेऊन घटनास्थळी पोहचले. पोलीसांचा प्रचंड ताफ्यात अतिक्रमण विभागाने नाल्याच्या काठावरील २७ घरांचे अतिक्रमण काढले.
राजविलास थिएटर समोरील दुकानांवर कारवाई
गांधीबाग झोन अंतर्गत राजविलास थिएटर समोरील समोरील दुकानांवरही अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये दुकानाचे ग्रील व शेटर काढण्यात आले. त्या नंतर अवैध पद्धतीने बांधलेले पुस्तकाचे ३ दुकान व चहा/नाश्ता चे २ दुकान तोडण्यात आले.
महाराजबाग परिसरातील टेडीबियर वाल्यांचे अतिक्रमण काढले
धरमपेठ झोन अंतर्गत महाराजबाग परिसरातील टेडी बियर वाल्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले. त्यानंतर झाशीराणी चौक ते मुंजे चौक ते व्हेरायटी चौक ते परत महाराजबाग रोड लता मंगेशकर दवाखाना समोरील परिसरपर्यंत अतिक्रमणची कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूवरील रोड व फूटपाथवर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले. परिसरातील अंदाजे ४२ अतिक्रमण हटविले, तसेच परिसर मोकळा करण्यात आला. ही कारवाई उपायुक्त अशोक पाटील, सहा. आयुक्त हरीष राऊत, प्रवर्तन अधीक्षक संजय कांबळे, सुनील सरपाटे, भास्कर माळवे, विनोद कोकार्डे, विनोद डोंगरे, बाबाराव श्रीखंडे यांच्या पथकाद्वारे करण्यात आली.