नागपूर रेल्वेस्थानकावर ओझे उचलणारे कुली जोपासताहेत सेवाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 10:32 PM2019-09-18T22:32:10+5:302019-09-18T22:33:55+5:30

सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल माजिद शेख आणि त्यांचा सहकारी प्रेमसिंग मीना यांनी चार दिवसांपूर्वी आपला जीव धोक्यात घालून एका सात वर्षांच्या मुलाचा जीव वाचवून मानवतेचा परिचय सर्वांना करून दिला.

Loading Porter on Nagpur railway station preserved public spirit | नागपूर रेल्वेस्थानकावर ओझे उचलणारे कुली जोपासताहेत सेवाभाव

आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वेगाडी आणि प्लॅटफार्ममध्ये पडलेल्या मुलाचा जीव वाचविणारे कुली अब्दुल माजिद शेख, प्रेमसींग मीना.

googlenewsNext
ठळक मुद्देमुलाला दिले जीवदान : नेहमीच करतात प्रवाशांची मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवाशांचे ओझे उचलून आपला उदरनिर्वाह करण्याचे काम रेल्वेस्थानकावरील कुली वर्षानुवर्ष करीत आहेत. परंतु आपल्या कामासोबत सेवाभाव जोपासून सातत्याने प्रवाशांना मदत करण्याचे काम सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल माजिद शेख आणि त्यांचा सहकारी प्रेमसिंग मीना यांनी केले आहे. चार दिवसांपूर्वी आपला जीव धोक्यात घालून एका सात वर्षांच्या मुलाचा जीव वाचवून त्यांनी मानवतेचा परिचय सर्वांना करून दिला आहे.
अब्दुल माजिद शेख (५०) हे मूळचे राजस्थान येथील रहिवासी आहेत. २० वर्षांपूर्वी ते नागपुरात आले. रेल्वेस्थानकावर त्यांनी कुलीचे काम सुरु केले. तेंव्हापासून नागपूर रेल्वेस्थानक त्यांच्या कुटुंबासारखे झाले आहे. त्यांना पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी आहे. कुली संघटनेचे अध्यक्ष म्हणून ते सर्व कुली बांधवांना आपल्या भावासारखी वागणूक देतात. आजपर्यंत रेल्वेस्थानकावर त्यांनी अनेक घटनातून आपल्यातील मानवतेचा परिचय घडविला आहे. एकदा संत्रा मार्केट गेटकडील भागात गाडीतून उतरल्यानंतर एक महिला घाईगडबडीत आपली १२ लाखाचे दागिने असलेली बॅग विसरून घरी गेली. ही बॅग अब्दुल माजिद शेख यांना सापडली. त्यांना या बॅगमध्ये लाखो रुपयांचे दागिने असल्याचे समजले. परंतु त्यांची नियत डगमगली नाही. त्यांनी बॅगमधील क्रमांकावर संपर्क साधून संबंधित महिलेला बॅग सुरक्षित असल्याचे कळविले अन् बॅग लोहमार्ग पोलिसात जमा केली. एक महिला आपल्या दोन मुलांसह रेल्वेस्थानकावर आत्महत्या करण्यासाठी आली होती. या महिलेचे प्राणही त्यांनी वाचविले. एका ९ वर्षाच्या बालकाचे अपहरण करून नेताना त्यांनी आरोपीला गजाआड करण्यात मदत करून त्या बालकाचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचविले. त्यांच्या या कार्यासाठी तत्कालीन लोहमार्ग पोलीस अधीक्षकांकडून त्यांचा गौरवही झाला होता.
जीवाची बाजी लावून मुलाला दिले जीवदान
चार दिवसांपूर्वी प्लॅटफार्म आणि रेल्वेगाडीच्या मध्ये पडलेल्या सात वर्षाच्या मुलाचा जीव वाचविण्यासाठी अब्दुल माजिद शेख आणि कुली प्रेमसिंग मीना यांनी दाखविलेले धाडस तर अनेकांना थक्क करणारे आहे. प्रेमसिंग मीना (३०) हा कुलीही मुळचा राजस्थानचा. त्याला आईवडिल, पत्नी आणि दोन मुले आहेत. सहा वर्षांपासून तो कुलीचे काम करतो. मुलगा प्लॅटफार्म आणि गाडीच्या मध्ये पडल्याचे समजताच अब्दुल माजिद शेख आणि मीना यांनी तातडीने गाडीकडे धाव घेतली. गाडीच्या कोचमध्ये जाऊन दुसऱ्या भागातून खाली उतरून या मुलाला सुखरुप बाहेर काढले. गाडी सुरु झाली असती तर या दोघांचाही जीव धोक्यात आला असता. परंतु आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी मुलाचे प्राण वाचविण्यासाठी धडपड केली. अनेकदा गाडीचा कोच बदलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यानंतर त्यांनी प्रवाशांचे सामान पैसे न घेता दुसऱ्या कोचमध्ये पोहोचविण्यास मदत केली आहे. केवळ पैसे कमविण्याचा उद्देश न ठेवता वेळोवेळी अडचणीतील प्रवाशांना मदत करून मानवतेचा परिचय दिला आहे.

Web Title: Loading Porter on Nagpur railway station preserved public spirit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.