बोर्डाच्या इमारतीत दारूच्या बाटल्या
By Admin | Updated: August 12, 2016 02:40 IST2016-08-12T02:40:21+5:302016-08-12T02:40:21+5:30
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांचे नियोजन आणि नियंत्रण करणाऱ्या नागपूर बोर्डाच्या इमारतीत दारूच्या बाटल्या आढळल्या आहे.

बोर्डाच्या इमारतीत दारूच्या बाटल्या
गोपनीय दस्तावेजाची सुरक्षा वाऱ्यावर : हॉल रिकामा तरीही लाईट, पंखे सुरू
नागपूर : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांचे नियोजन आणि नियंत्रण करणाऱ्या नागपूर बोर्डाच्या इमारतीत दारूच्या बाटल्या आढळल्या आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या संदर्भातील गोपनीय दस्तावेजही ओसाड पडले आहे. असामाजिक तत्त्वाला सहजतेने वावरता येईल अशी अवस्था बोर्डाची आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या मंडळात होत असलेले असे प्रकार बघून बोर्डाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागीय मंडळाची इमारत बाहेरून चकाचक दिसत असली तरी, इमारतीच्या आतमध्ये सुरू असलेला प्रकार धक्कादायकच आहे. लोकमतच्या टीमने गुरुवारी बोर्डाच्या इमारतीत केलेल्या आॅन दी स्पॉट पाहणीत भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या इमारतीत विद्यार्थ्यांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात दस्तावेज ठेवले आहे. परंतु कुठलीही सुरक्षा व्यवस्था नाही. त्यामुळे असामाजिक तत्त्व सहज पोहोचून गोपनीय दस्तावेज गहाळ करू शकतात. जुनी इमारत असलेल्या काही कक्षामध्ये साहित्य उघड्यावर पडले आहे. इमारतीत स्वच्छतेचाही अभाव दिसून येतो. कचरा, लोखंडी पेट्या जिथे-तिथे पडलेल्या आहे. बोर्डाच्या इमारतीच्या मागच्या भागात मोठ्या प्रमाणात लोखंडी पेट्या पडलेल्या आहे. येथील स्वच्छतागृह अतिशय घाणेरडे आहे. कुत्र्यांचा वावर इमारत परिसरात बघायला मिळतो. नव्या इमारतीत एक भव्य हॉल तयार करण्यात आला आहे. या हॉलमध्ये टेबल खुर्च्या, काही दस्तावेजासह लोखंडी पेट्या पडलेल्या आहे. या हॉलचा प्रशिक्षणासाठी उपयोग होतो. एरवी बंदच असतो. गुरुवारी या हॉलमध्ये कुठलेही प्रशिक्षण नसतानाही हॉलचे सर्व लाईट, पंखे सुरू होते. अशीच अवस्था अनेक कक्षात बघायला मिळाली. कर्मचारी नसतानाही विजेचे दिवे, पंखे सुरूच होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इमारतीच्या टॉप फ्लोअरवर दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या. इमारतीच्या मागच्या भागात दारूच्या बाटल्या व ग्लास पडलेले होते. इमारतीच्या समोरच्या गेटवर काही सुरक्षा रक्षक तैनात असतात. परंतु आतमध्ये कुठेही मोकाटपणे फिरता येते. बोर्डाच्या इमारतीच्या परिसरात पडलेल्या दारूच्या बाटल्या, ग्लास लक्षात घेता, सायंकाळी येथे दारुड्यांचा अड्डाच भरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)