तरल भावनांचे रंग ‘काही क्षण आयुष्याचे’
By Admin | Updated: August 25, 2014 01:19 IST2014-08-25T01:19:23+5:302014-08-25T01:19:23+5:30
माणूस एका आशेवर जगत असतो आणि आयुष्याकडून त्याला काही अपेक्षा असतात. या अपेक्षांची पूर्तता होत नाही तेव्हा आयुष्याच्या संध्याकाळी ही निराशा झेलण्याची शक्तीही उरत नाही.

तरल भावनांचे रंग ‘काही क्षण आयुष्याचे’
नागपूर : माणूस एका आशेवर जगत असतो आणि आयुष्याकडून त्याला काही अपेक्षा असतात. या अपेक्षांची पूर्तता होत नाही तेव्हा आयुष्याच्या संध्याकाळी ही निराशा झेलण्याची शक्तीही उरत नाही. मानवी भावभावनांची हळुवार गुंफण, नात्यांची घट्ट होत जाणारी आणि त्यातील गुंतागुंत सोडविताना तुटणारे काही हळवे धागे अनेकदा स्वप्नांना उधळून लावत असतात. सामान्य माणसांच्या आयुष्याकडून असलेल्या किमान अपेक्षाही अनेकदा पूर्ण होत नाहीत आणि एक वेदना आयुष्य व्यापून उरते. नातेसंबंधांच्या हळव्या बाजूंना स्पर्श करीत तरल भावनांचे तरंग मनात निर्माण करीत ‘काही क्षण आयुष्याचे’ या नाट्यप्रयोगाने रसिकांना अंतर्मुख केले. संजय भरडे यांच्यातर्फे चंद्रवैभव निर्मित आणि स्वानंद सांस्कृतिक संस्थेतर्फे प्रस्तुत या नाटकाचा पहिलाच व्यावसायिक प्रयोग आज डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. रसिकांच्या उपस्थितीने या प्रयोगाला चांगला प्रतिसाद लाभला. राज्य नाट्य स्पर्धेत अनेक पारितोषिकांनी गौरविलेले हे नाटक संजय भरडे यांनी व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचा निर्णय घेतला, त्यातील हा पहिला प्रयोग होता. एकूणच आपली जीवनशैली बदलली, राहणीमान बदलले आणि मुले शिक्षणानंतर पालकांपासून दूर होऊ लागली. पाल्यांना मिळणारा पैसा, त्यांचे करिअर आणि त्यांना नोकरीसाठी स्वीकारावा लागणारा बदल अपरिहार्य झाला पण त्यात आपल्या वृद्ध मायबापांचीच त्यांना अडगळ वाटू लागते तेव्हा कौटुंबिक समस्या निर्माण होतात.
प्रामुख्याने उतारवयात मुलांची गरज असताना मुले जवळ नसतात आणि हाच काळ वृद्धांसाठी दु:खाच्या हळवेपणाची किनार गडद करणारा असतो. या विविध नात्यांचे पदर मनीष आणि रोहिणी मोहरील यांनी आपल्या अभिनयातून हळुवार उकलले. तरल भावनांच्या हिंदोळ्यावर कधी सुख तर कधी दु:खाच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या या नाट्याची अखेर शोकांतिकाच म्हणावी लागेल पण अखेर करतानाही पुन्हा सृजनाच्या नवपालवीची आशा कायम ठेवूनच हे नाट्य संपते.
सातत्याने स्वप्नांकडे धावत राहण्याची वृत्ती मानवी जीवनात सामान्यत: असतेच पण हा प्रवास अनेक काट्यांनीच भरला असतो. काही फुलेही त्यावर उमलतात पण...यावरच भाष्य करणारे, अंतर्मुख करणारे आणि विचारप्रवृत्त करणारेही हे नाट्य होते. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन रोशन नंदवंशी यांनी केले होते. उतारवयात मुले घरातून बाहेर पडल्यावर होणारी तगमग, तळमळ रोहिणी आणि मनीषने ताकदीने सादर केली.
दोघांच्याही अभिनयात सहजपणा होता आणि वेगवेगळ्या वयाला अभिनित करताना त्यांनी कौशल्य पणाला लावल्याचे जाणविले. केवळ दोनच पात्र रंगमंचावर असूनही प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात हे नाटक यशस्वी ठरले. पहिलाच प्रयोग असल्याने काही चुका असल्या तरी रसिकांच्या अपेक्षा वाढविण्यात हे नाटक यशस्वी ठरले. नाटकाचे नेमकेपणाने आणि भावनांना बळकटी देणारे संगीत वीरेन्द्र लाटणकर यांचे होेते. काही प्रसंगात त्यांनी केलेला गीतांचा उपयोग परिणामकारक तर अखेरच्या प्रसंगाला चपखलपणे निवडलेले ‘नकळता असे...’ गीत परिणाम साधणारे. बारकाईने विचार करून संगीताची बाजू लाटणकर यांनी सांभाळली. मिथून मित्रा यांची प्रकाशयोजना आणि कालचक्रासाठी त्यांनी उपयोगात आणलेली संकल्पना प्रशंसनीय होती. डोळ्यांच्या कडा अलगद ओलावत प्रेक्षकांना गुंतविणारे नाटक म्हणून याचा उल्लेख करावा लागेल. (प्रतिनिधी)