डायलिसिसवरील ६० टक्के कोविड रुग्णांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:07 IST2020-12-08T04:07:54+5:302020-12-08T04:07:54+5:30
नागपूर : कोरोनाबाधितांच्या मृत्यूमागे ‘को-मॉर्बिडिटी’ म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि किडनी विकारासारखे आजार असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. ...

डायलिसिसवरील ६० टक्के कोविड रुग्णांना जीवनदान
नागपूर : कोरोनाबाधितांच्या मृत्यूमागे ‘को-मॉर्बिडिटी’ म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि किडनी विकारासारखे आजार असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) कोविड पॉझिटिव्ह किडनी विकाराच्या रुग्णांसाठी डायलिसिससारखी विशेष सोय केल्याने ६० टक्के रुग्णांचा जीव वाचविण्यात यश आले. कोरोना दहशतीच्या काळातील ही दिलसादायक घटना आहे.
मूत्रपिंड (किडनी) विकारावर नियंत्रण नसलेल्या व कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये गुंतागुंत निर्माण होऊन मृत्यूची शक्यता अधिक असते. नागपूर जिल्ह्यात कोविडमुळे ३७३५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. यात किडनी विकाराच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. तज्ज्ञांच्या मते, किडनीचा विकार असलेल्या रुग्णाला कोविडची लागण झाल्यास यातील जवळपास १५ टक्के रुग्णांमध्ये अॅक्यूट किंवा तीव्र मूत्रपिंडाचा आजार होण्याची शक्यता अधिक असते. कोरोना विषाणू प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे मूत्रपिंडावर परिणाम करतो. कोरोना संसर्गाच्या विळख्यात सापडलेले आयसीयूमध्ये दाखल असलेल्या रुग्णांपैकी सुमारे २७ टक्के रुग्णांना मूत्रपिंड निकामी होण्याच्या स्थितीला सामोर जावे लागते. याची दखल घेत मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी कोविड हॉस्पिटलमध्ये ६ तर नॉन कोविड रुग्णांसाठी ४ हिमो डायलिसिसचे यंत्र उपलब्ध करून दिले. याचा मोठा फायदा कोविड रुग्णांना झाला. तातडीने डायलिसिस झाल्याने रुग्णांना जीवनदान मिळाले.
-कोविड पॉझिटिव्ह मूत्रपिंडाचे ११० रुग्ण
कोरोनाच्या आठ महिन्याच्या काळात मेडिकलमध्ये कोविड पॉझिटिव्ह मूत्रपिंडाच्या विकाराचे ११० रुग्ण आढळून आले. या रुग्णांवर साधारण ३५० हिमोडायलिसिससह इतर आवश्यक उपचार करण्यात आले. परिणामी, ६० टक्के रुग्णांना नवे जीवन मिळाले. डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील, डॉ. राजेश गोसावी, डॉ. वंदना आमदने यांचे विशेष प्रयत्न राहिले आहेत.