सासऱ्याच्या खुनात जावयाला जन्मठेप

By Admin | Updated: August 13, 2016 02:00 IST2016-08-13T02:00:16+5:302016-08-13T02:00:16+5:30

उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उदासा येथे कुऱ्हाडीने घाव घालून सासऱ्याचा खून आणि सासूला गंभीर जखमी करणाऱ्या आरोपी जावयास

Life improvisation | सासऱ्याच्या खुनात जावयाला जन्मठेप

सासऱ्याच्या खुनात जावयाला जन्मठेप

पत्नीला नेण्यास केला होता विरोध : उदासा येथील थरार
नागपूर : उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उदासा येथे कुऱ्हाडीने घाव घालून सासऱ्याचा खून आणि सासूला गंभीर जखमी करणाऱ्या आरोपी जावयास अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप खोचे यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अशोक किसन कन्नाके (४०), असे आरोपीचे नाव असून तो उमरेड भागातीलच गोधनी येथील रहिवासी आहे. मधुकर बुधाजी गेडाम (७०) रा. उदासा, असे मृताचे नाव होते. सासू चंद्रभागा मधुकर गेडाम (६०) आणि पत्नी पुष्पा अशोक कन्नाके (३५), असे घटनेच्या वेळी जखमी झालेल्यांची नावे होती.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, अशोक कन्नाके हा कोणताही कामधंदा न करता पत्नी पुष्पाचे रोजमजुरीचे पैसे हिसकावून दारू प्यायचा आणि घरून बराच काळ बेपत्ता राहायचा. पैसे संपले की पुन्हा घरी यायचा. पत्नीने पैसे दिले नाही की, मारहाण करायचा. त्याच्या त्रासाने पुष्पा २६ जानेवारी २०१५ रोजी आपल्या उदासा येथील माहेरी गेली होती. तिच्या मागेच अशोक कन्नाके हा उदासा येथे गेला होता. त्याने पुष्पाला सोबत चल म्हणताच तिने येण्यास नकार दिला होता. या शिवाय सासरे मधुकर गेडाम आणि सासू चंद्रभागा यांनीही त्याला पुष्पाला नेण्यास मज्जाव केला होता. पंचकमिटी बसवतो, असे ते त्याला म्हणाले होते. त्यामुळे तो रागाने निघून गेला होता.
३० जानेवारी २०१५ च्या रात्री १०.३० वाजताच्या सुमारास मधुकर आणि त्यांची पत्नी चंद्रभागा हे एकाच खाटेवर झोपलेले असताना अशोक हा दाराला धक्का देऊन आत शिरला होता. त्याने झोपलेल्या सासू-सासऱ्यावर कुऱ्हाडीने घाव घालणे सुरू केले होते. आवाजाने पुष्पा झोपेतून उठातच तिला हे भयावह दृश्य दिसले होते. ती आई-वडिलाच्या बचावासाठी धावताच अशोकने तिच्यावरही वार केला होता. तिचे डोके फुटले होते. जखमींना उपचारार्थ शासकीय इस्पितळात नेण्यात आले असता मधुकर गेडाम यांचा मृत्यू झाला होता. उमरेडचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक नितीन वडते यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा सुनावली. आरोपीची पत्नी पुष्पा आणि दोन मुलांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत करण्याची शिफारस न्यायालयाने विधी सेवा प्राधिकरणाला केली आहे.
न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील एम. जी. पौळ यांनी काम पाहिले. उपनिरीक्षक डी. एम. म्हात्रे , हेड कॉन्स्टेबल अरुण नेवारे आणि अशोक काळे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Life improvisation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.