‘पत्र’ कमी झाले,‘व्यवहार’ वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:42 IST2017-10-10T00:40:14+5:302017-10-10T00:42:00+5:30
‘हम ने सनम को खत लिखा...’ दूरवर कुठेतरी असलेल्या नात्याशी जुळून राहण्यासाठी पोस्टाची महती सांगणार हे गाणे.

‘पत्र’ कमी झाले,‘व्यवहार’ वाढले
निशांत वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘हम ने सनम को खत लिखा...’ दूरवर कुठेतरी असलेल्या नात्याशी जुळून राहण्यासाठी पोस्टाची महती सांगणार हे गाणे. पूर्वी पोस्टमन म्हणजे असे भावनिक नाते जुळवून ठेवणारा माणूस. गाणे आणि नाती आजही तशीच आहेत, यातला पोस्टमन मात्र हरवलाय. दूरचा हालहवाल, भावनिक गुंतागुंत जाणण्यासाठी आज पोस्टकार्ड, आंतरदेशीचा वापर बंद झाला आहे. इंटरनेट, मोबाईलच्या एका क्लीकवर संपूर्ण जग जवळ आले असताना पत्राचा वापर कोण करणार? बदल मान्य करावाच लागतो. पत्राचे मुख्य काम कमी झाले म्हणून पोस्टाकडे काम नाही, असा गैरसमज मात्र कुणी करू नये. लोकांपर्यंत पोहचण्यासाठी नवनवीन सेवा, योजना पोस्टाने सुरू केल्या आहेत. त्यामुळे पत्र कमी झाले, ‘व्यवहार’ नाही अशी भावना पोस्टात काम करणारा प्रत्येक माणूस व्यक्त करतो.
जागतिक डाक दिनानिमित्त डाक विभागाने सोमवारी ‘इंटरनॅशनल ट्रॅक पॉकेट सेवा’ सुरू केली. जीपीओ नागपूरचे वरिष्ठ डाकपाल मोहन निकम यांनी माहिती देताना सांगितले, ही सेवा आॅस्ट्रेलिया, जापान, कंबोडिया, हाँगकाँग आदी आशिया पॅसिफिकमधल्या १२ देशांसाठी आहे. यामध्ये अत्यल्प दरात दोन किलो वजनापर्यंतची वस्तू या १२ देशात पाठविली जाऊ शकते. विशेष म्हणजे वस्तू पाठविणारी व्यक्ती घरबसल्या आपल्या वस्तूचे लोकेशन माहिती करू शक णार आहे. पोस्टाची ही सेवासुद्धा लोकप्रिय ठरेल असा विश्वास निकम यांनी व्यक्त केला.
बदलत्या काळानुसार बदल करून पोस्टाने अनेक सेवा वेळोवळी सुरू केल्या. स्पीड पोस्ट, ई-पोस्ट, फर्स्ट क्लास मेल, एक्स्प्रेस, पार्सल, कॅश आॅन डिलिव्हरी आणि बँकिंग क्षेत्राशी संबंधित व्यवहारांचाही विस्तार करण्यात आला आहे. शहरात ६६ पोस्ट आॅफिस व दोन मुख्य डाकघर आहेत. स्पीड पोस्टच्या माध्यमातून दर महिन्याला एक लाखाच्या वर ग्राहकांची नोंद होत असून २ लाख ३८ हजार पोस्ट डिलिव्हर केल्या जातात. याशिवाय शासकीय, अशासकीय, खासगी कंपन्या, संस्थांचा पत्रव्यवहार आणि मार्केटिंगचे कामही पोस्टाच्या माध्यमातून होत असून पोस्टमनचे काम दुपटीने वाढले आहे. मोबाईलवर दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा काळ असला तरी पोस्टाद्वारे ग्रिटिंग पाठविणेही पसंत केले जाते. ई-पोस्ट तशी शासकीय कामकाजात लोकप्रिय सेवा आहे. मात्र ई-पोस्टच्या माध्यमातून शुभेच्छा कार्ड पाठविणाºयांचीही संख्या कमी नसल्याचे निकम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
सव्वाशे वर्षांचा डाक विमा
भारतात सर्वात आधी डाक विभागाने १८८४ साली विम्याची सेवा सुरू केली होती. सुरुवातीला ही सेवा मुख्यत: खडतर काम करणाºया पोस्टमन व इतर कर्मचाºयांसाठी होती. पुढे सेवेचा विस्तार करून सामान्य लोकांसाठीही सुरू करण्यात आली. सध्या नागपूर विभागातील १ लाख १६ हजार ४०४ शासकीय कर्मचारी या विम्याचे लाभधारक असून ग्रामीण भागातील ५ लाख ३८ हजार ८० सामान्य ग्राहक ही सुविधा घेत आहेत. विशेष बाब म्हणजे ही विमा सेवा महामहीम राष्टÑपतींच्याद्वारे काढली जाते.
‘माय स्टॅम्प’चा विस्तार
सामान्य माणूस स्वत:चा फोटो असलेला स्टॅम्प तयार करू शकेल अशी सुविधा डाक विभागाने ‘माय स्टॅम्प’च्या माध्यमातून तीन वर्षांपासून सुरू केली आहे. या सुविधेचा विस्तार करीत फिलाटेली विभागाने शाळा किंवा सामाजिक संस्थांची आठवण असलेला स्टॅम्प तयार करण्याची सुविधा सुरू केली आहे. तसे कुणीही याची मागणी करू शकतो, मात्र २५ वर्षे झालेल्या संस्थांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन निकम यांनी केले. फिलाटेली डिपॉजिट अकाऊंट (पीडीए)द्वारे नवीन आलेले स्टॅम्प सर्व माहितीसह शाळांमध्ये पाठविण्याची सेवाही विभागाने सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
आता रामायणचेही स्टॅम्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ सप्टेंबर रोजी वाराणसी येथे रामायणातील काही प्रसंगांच्या पोस्टल स्टॅम्पचे लोकार्पण केले होते. यामध्ये सीता स्वयंवरपासून रावणाच्या वधापर्यंतचे प्रसंग असलेल्या ११ स्टॅम्पचा समावेश आहे. शीटलेट व मिनिएचर शीटमध्ये हे स्टॅम्प जीपीओच्या फिलाटेली विभागात उपलब्ध आहेत. हे स्टॅम्प फ्रेममध्ये उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे.