निवडणूक आयोगाला दहा नोटिसा पाठवू द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:08 IST2021-04-09T04:08:35+5:302021-04-09T04:08:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क दोमजूर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुस्लीम मतदारांनी तृणमूलला मतदान करावे, असे आवाहन केले ...

निवडणूक आयोगाला दहा नोटिसा पाठवू द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
दोमजूर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुस्लीम मतदारांनी तृणमूलला मतदान करावे, असे आवाहन केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने त्यांना आचारसंहिता भंगाची नोटीस पाठविली. यावरून ममता आक्रमक झाल्या आहेत. धर्माच्या आधारावर मतदारांचे ध्रुवीकरण करणाऱ्यांचा विरोध करतच राहणार असून आयोगाला दहा नोटिसा पाठवू द्या, असे म्हणत त्यांनी आयोगालाच आव्हान दिले.
प्रचारसभेदरम्यान त्या बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात हिंदू व मुस्लिमांच्या व्होटबँकेचा उल्लेख करतात त्या वेळी त्यांच्याविरोधात कुठलीच तक्रार का दाखल होत नाही, असा सवाल ममता यांनी केला. निवडणूक आयोगाने कितीही नोटिसा पाठविल्या तरी माझे उत्तर एकच असेल. हिंदू-मुस्लीम मतांच्या विभाजनाविरोधात मी बोलतच राहीन, असे त्यांनी स्पष्ट केले. नंदिग्राममध्ये निवडणूक असताना काही नेत्यांनी ‘मिनी पाकिस्तान’ या शब्दाचा उपयोग केला होता. त्यांच्याविरोधात किती तक्रारी दाखल झाल्या, असा सवाल त्यांनी आयोगाला केला.