टोलविरोधी आंदोलनाला भाजप नेत्यांची पाठ
By Admin | Updated: January 22, 2015 02:37 IST2015-01-22T02:37:21+5:302015-01-22T02:37:21+5:30
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या विधान परिषद सदस्य शोभाताई फडणवीस टोल वसुलीविरोधात बुधवारी रस्त्यावर उतरल्या.

टोलविरोधी आंदोलनाला भाजप नेत्यांची पाठ
रामटेक/बोरखेडी: भाजपच्या ज्येष्ठ नेत्या विधान परिषद सदस्य शोभाताई फडणवीस टोल वसुलीविरोधात बुधवारी रस्त्यावर उतरल्या. नागपूर जिल्ह्यातील मनसर आणि बोरखेडी येथील टोलनाके बंद करण्यात यावे, यासाठी त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनामुळे नागपूर-हैदराबाद आणि नागपूर-जबलपूर महामार्गावरील वाहतूक काही तासांसाठी विस्कळीत झाली.
राज्यात सत्ता आल्यानंतर टोलनाके बंद करण्याची घोषणा भाजपने केली होती. मात्र राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. बुधवारी झालेल्या या आंदोलनाला जिल्ह्यातील भाजप नेते आणि आमदारांनी पाठ फिरविली, त्यामुळे टोल नाके बंद करण्यात भाजपात असलेले मतभेद पुन्हा दिसून आले.
मनसर आणि बोरखेडी टोल नाके बंद करण्याची मागणी यापूर्वी आ. शोभाताई फडणवीस यांनी केली होती. बोरखेडी आणि मनसर टोलनाके असलेल्या मार्गाच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शोभाताई फडणवीस यांनी टोलविरोधात आंदोलन केले. नियमापेक्षा अधिकवसूली होत असेल तर याची चौकशी झाली पाहिजे. यातून सत्य बाहेर येईल.
डॉ. राजीव पोतदार,
जिल्हाध्यक्ष, भाजप
गरिबांच्या खिशावर दरोडा
बोरखेडी आणि मनसर टोलनाक्यावर करण्यात येत असलेली टोलवसुली हा गरिबांच्या खिशावर दरोडा आहे. हा प्रोजेक्ट ३५० कोटी रुपयांचा आहे. ओरिएन्टल कंपनीने आतापर्यंत बोरखेडी नाक्यावर वाहनचालकांकडून ७०० कोटी रुपये वसूल केले. हा नाका २०३७ पर्यंत सुरू राहणार आहे. नाक्याच्या २० कि.मी. अंतराच्या परिसरातील नागरिकांकडूनही टोल वसूूल केला जात आहे. शेतीपयोगी वाहने, शेतीमालाची व दुधाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरही टोल लावला जात आहे. मनसर टोलनाक्याचा लेखाजोखाही त्यांनी यावेळी मांडला. ओरिएन्टल कंपनीने आतापर्यंत केलेल्या टोलवसुलीतून खर्चाच्या वसुलीव्यतिरिक्त ३९८.९९ कोटी रुपये जास्तीचे वसूल केले. कंपनीला या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सहकार्य करीत आहे.
- आ. शोभाताई फडणवीस