विदर्भात तुरीचे उत्पादन कमी, कृत्रिम भाववाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 10:53 AM2019-02-06T10:53:35+5:302019-02-06T10:56:32+5:30

गेल्यावर्षी तुरीला भाव न मिळाल्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी तुरीऐवजी कापूस आणि सोयाबीनच्या लागवडीवर भर दिला. शेतकऱ्यांनी तुरीची लागवड कमी तर केलीच पण पोषक हवामानाअभावी तुरीचा उतारासुद्धा कमी येण्याचा अंदाज आहे.

Less production of yellow split pigeon peas in Vidarbha, artificial price rise | विदर्भात तुरीचे उत्पादन कमी, कृत्रिम भाववाढ

विदर्भात तुरीचे उत्पादन कमी, कृत्रिम भाववाढ

googlenewsNext
ठळक मुद्दे१५ दिवसानंतर खरे भाव कळणारअधिकाऱ्यांनी कारवाई करावी

मोरेश्वर मानापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्यावर्षी तुरीला भाव न मिळाल्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी तुरीऐवजी कापूस आणि सोयाबीनच्या लागवडीवर भर दिला. शेतकऱ्यांनी तुरीची लागवड कमी तर केलीच पण पोषक हवामानाअभावी तुरीचा उतारासुद्धा कमी येण्याचा अंदाज आहे. नवीन तूर १५ दिवसानंतर बाजारात येणार आहे. व्यापाऱ्यांनी ही बाब हेरून १० दिवसांपासून स्वत:जवळील तूर डाळीचा जुना साठा बाजारात आणून कृत्रिम भाववाढ सुरू केली आहे. भाववाढीवर आतापासूनच अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियंत्रण आणावे, अशी मागणी ग्राहक संघटनांनी लोकमतशी बोलताना केली.
१५ दिवसापूर्वी किरकोळ बाजारात ७० ते ७५ रुपयांला विकण्यात येणाऱ्या तूर डाळीचे भाव सध्या ८० ते ८५ रुपयांवर पोहोचले आहेत. यंदा तूर डाळीचे उत्पादन कमी होण्याचे मौखिक वृत्त पसरवून व्यापारी स्वत:ची पोळी शेकून संघटितरीत्या दरदिवशी भाव वाढवित आहेत. त्या तुलनेत शेतकऱ्यांना नवीन तुरीला ४५०० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना जास्त किमतीत तूर डाळ खरेदी करावी लागत आहे. आतापासून व्यापाऱ्यांवर लगाम न लावल्यास व्यापारी संघटितरीत्या आणखी भाव वाढवतील आणि निवडणुकीच्या तोंडावर सरकारच्या नाकीनऊ येईल, अशी शक्यता अ.भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ संघटन मंत्री गजानन पांडे यांनी व्यक्त केली.
अडीच ते तीन वर्षांपूर्वी व्यापाऱ्यांनी मागणी आणि पुरवठ्यात तफावत असल्याचे सांगून तूर डाळीचे भाव कृत्रिमरित्या प्रति किलो १८० रुपयांपर्यंत नेले होते. त्यामुळे तूर डाळ गरीब आणि सामान्यांच्या ताटातून गायब झाली होती. यावर सरकारने तात्काळ निर्णय घेत विदेशातून डाळ मागविली होती. शिवाय कमी भावात रेशन दुकानांमध्ये विकली होती. शेतकऱ्यांनीही दुसऱ्या हंगामात विक्रमी लागवड करून पीक घेतले होते. परिणामी दोन हंगामात तूर डाळीचे भाव प्रचंड प्रमाणात खाली आले होते.
गेल्यावर्षीच्या हंगामात तूर प्रति क्विंटल ३२०० ते ३४०० रुपये आणि तूर डाळीला ठोक बाजारात गुणवत्तेनुसार ५० ते ५५ रुपये भाव होते. किरकोळ दुकानांमध्ये चांगल्या प्रतीची डाळ ६० ते ६५ रुपयांत अनेक महिने उपलब्ध होती. स्वताईनंतरही उठाव कमी होता. त्यामुळे अनेक दालमिल बंद झाल्या होत्या. त्याप्रमाणे विक्रमी उत्पादनामुळे सर्वच डाळींचे भाव अर्ध्यापेक्षा कमी किमतीवर आले होते. पण व्यापारी पुन्हा एकदा संधी साधून तूर डाळीच्या किमती कृत्रिमरीत्या वाढवित आहे. त्याचा फटका केवळ ग्राहकांना बसत आहे.
आयात सुरू करावी
शेतकऱ्यांच्या पिकाला चांगले भाव मिळावेत म्हणून केंद्र सरकारने तूर आणि डाळीच्या आयातीवर निर्बंध लावले आणि अन्य डाळींवर आयात शुल्क वाढविले. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकाला चांगले भाव मिळेल, ही सरकारची अपेक्षा फोल ठरली. शेतकऱ्यांना तुरीला भाव मिळालाच नाही. शिवाय बाजारात डाळीला उठावही नव्हता. यंदाच्या हंगामात तूर पूर्णपणे बाजारात आली नाहीच, त्यानंतरही व्यापारी १५ दिवसांपासून तूर डाळीचे भाव वाढवित आहेत. व्यापारी या महिन्यात तूरडाळीचे भाव प्रति किलो १०० रुपयांवर नेण्याच्या तयारीत आहेत. भाव वाढवून व्यापारी नफा कमवित आहेत. भाववाढीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने आतापासून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पांडे यांनी केली.

भाववाढीचे विरोधकांना मिळणार हत्यार
तूरडाळ सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कांद्याच्या भाववाढीने दिल्लीतील भाजपा सरकारला सत्तेतून जावे लागले होते. अडीच ते तीन वर्षांपूर्वी तूरडाळीच्या किमती १८० रुपयांवर गेल्याचे सर्वांनाच ज्ञात आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू झाले आहे. व्यापाऱ्यांनी संघटितपणे तूरडाळीच्या किमती पूर्वीप्रमाणे १५० रुपयांवर नेल्यास सरकारला आयातीला वेळ मिळणार नाही. शिवाय शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळवून देण्याच्या नादात सरकारला पुढे तूरडाळीच्या किमतीत नियंत्रण मिळविणे कठीण होईल आणि भाववाढीचे विरोधकांना आयतेच हत्यार मिळेल, अशी शक्यता पांडे यांनी व्यक्त केली.

Web Title: Less production of yellow split pigeon peas in Vidarbha, artificial price rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती