नागपूर नजीकच्या कळमेश्वर वन परिक्षेत्रात बिबट्याचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 23:28 IST2019-12-28T23:28:09+5:302019-12-28T23:28:58+5:30
कळमेश्वर वन परिक्षेत्रात येणाऱ्या पानउबाळी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना तो दिसला असून त्या संदर्भात वन विभागाला माहिती देण्यात आली आहे.

नागपूर नजीकच्या कळमेश्वर वन परिक्षेत्रात बिबट्याचा वावर
लोकमत न्यूज नीटवर्क
नागपूर : कळमेश्वर वन परिक्षेत्रात येणाऱ्या पानउबाळी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना तो दिसला असून त्या संदर्भात वन विभागाला माहिती देण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, नागपूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेचे (एलसीबी) पथक सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर गडेकर यांच्यासह या परिसरात शनिवारी गस्तीवर होते. दरम्यान सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांना पानउबाळी गावाजवळील बस थांब्याच्या जवळच असलेल्या नाल्यामध्ये एक बिबट्या दिसला. काही वेळाने तो गावाच्या दिशेने गेला. त्यामुळे सावधगिरीचा इशारा म्हणून या पथकाने गावच्या पोलीस पाटलाला मोबाईलवरून या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर वन विभागाच्याही कानावर ही माहिती टाकण्यात आली.
या परिसरात मागील काही महिन्यापूर्वी गावकऱ्यांना बिबट्या दिसला होता. मधल्या काळात तो या परिसरात आढळला नव्हता. मात्र आता पुन्हा त्याचे दर्शन झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कळमेश्वरचे वन परिक्षेत्र अधिकारी ए.आर. नोकरकर यांना या संदर्भात विचारणा केली असता, या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. आरक्षित जंगलामध्ये बिबट्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता बिबटे जंगलाबाहेरच्या क्षेत्रात फिरत असल्याचे त्यांनी सांगितले. या परिसरात बिबट्या दिसल्याच्या माहितीची खातरजमा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.