पारडीच्या भवानीनगरात बिबट्याचा धुमाकूळ, ५ ठिकाणी हल्ले, ७ जखमी, एकजण ‘आयसीयू’त
By दयानंद पाईकराव | Updated: December 10, 2025 13:55 IST2025-12-10T13:53:39+5:302025-12-10T13:55:00+5:30
Nagpur leopard Attack News: बुधवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास बिबट्याने पारडी परिसरातील भवानीनगर येथील पाच ठिकाणी हल्ले करीत ७ जणांना जखमी केल्याची घटना घडली. दरम्यान जखमींपैकी एका व्यक्तीला ‘आयसीयु’त दाखल करण्यात आले असून इतर जखमींवर पारडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पारडीच्या भवानीनगरात बिबट्याचा धुमाकूळ, ५ ठिकाणी हल्ले, ७ जखमी, एकजण ‘आयसीयू’त
- दयानंद पाईकराव
नागपूर - बुधवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास बिबट्याने पारडी परिसरातील भवानीनगर येथील पाच ठिकाणी हल्ले करीत ७ जणांना जखमी केल्याची घटना घडली. दरम्यान जखमींपैकी एका व्यक्तीला ‘आयसीयु’त दाखल करण्यात आले असून इतर जखमींवर पारडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे पारडी परिसरात खळबळ उडाली असून वनमंत्री गणेश नाईक यांनी घटनास्थळाला भेट दिली. अखेर सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास ट्रांझीट ट्रीटमेंट सेंटरच्या चमुने बिबट्याला पकडले अन् पारडी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
पारडी परिसरातील भवानीनगरात सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास बिबट्या शिरला. सुरुवातीला त्याने पाच ठिकाणी हल्ला चढविला. त्यानंतर हा बिबट कुंभकरण निशाद यांच्या घराच्या परिसरात आला. बिबट्याने कुंभकरण यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर हा बिबट वर्मा यांच्या घरी दुसऱ्या माळ्याच्या जिन्यावर लपून बसला होता. परिसरात बिबट्याने हल्ला केल्यामुळे ७ जण जखमी झाल्याची वार्ता पसरताच नागरिकांनी या परिसरात एकच गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच वनमंत्री गणेश नाईक, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. एस. रेड्डी, नागपूर वनवृत्ताच्या वनसंरक्षक श्री लक्ष्मी ए, नागपूर प्रादेशिक वन विभागाच्या उपवनसंरक्षक डॉ. वीनिता व्यास, अजिंक्य भटकर, उधमसिंग यादव, अविनाश लोंढे घटनास्थळी पोहोचले. वन विभागाच्या ट्रांझीट ट्रीटमेंट सेंटरने युद्धपातळीवर बिबट्याला रेस्क्यु करण्यासाठी ऑपरेशन सुरु केले. परंतु बिबट हा मोकळ्या जागेत असल्यामुळे त्याला पकडण्याचे मोठे आव्हान ट्रांझीट ट्रीटमेंट सेंटरच्या चमुसमोर होते. परंतु अत्यंत शिताफीने चमुने सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास बिबट्याला ट्रॅंक्युलाईज करीत रेस्क्यु केले. पकडण्यात आलेला बिबट ३ वर्षांचा असून त्याला सेमिनरी हिल्स येथील ट्रांझीट ट्रीटमेंट सेंटरमध्ये उपचारासाठी व निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.
अशी आहेत जखमींची नावे
पारडीच्या भवानीनगरात हल्ला केल्यामुळे कुंभकरण निशाद (५५) हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना ‘आयसीयु’त दाखल करण्यात आले आहे. तर लालेश्वरी शाहु (४०) चंदन शाहु (३७) यांना जनरल वॉर्डात भऱती करण्यात आले आहे. तर रमेश साहित्य (२८), खुशी शाहु (५), कुवसराम ढेकवाड (५७) आणि भारती शाहु (२४) यांना किरकोळ जखमा झाल्यामुळे त्यांच्यावर ओपीडीत उपचार करण्यात आले.